तरुणाला गंभीर जखमी केले, धूम ठोकणार इतक्यात पोलिसांनी पाठलाग करून पकडले..
By शिवाजी पवार | Updated: October 2, 2023 17:57 IST2023-10-02T17:55:00+5:302023-10-02T17:57:36+5:30
गंभीर जखमी व्यक्ती उपचारासाठी खासगी रुग्णालयात भरती

तरुणाला गंभीर जखमी केले, धूम ठोकणार इतक्यात पोलिसांनी पाठलाग करून पकडले..
शिवाजी पवार, लोकमत न्यूज नेटवर्क, श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : शहरात तरुणाच्या खुनाचा प्रयत्न करून मालेगावला पसार होण्याच्या प्रयत्नातील पाच आरोपींना शहर पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये केतन त्रिभुवन, आकाश त्रिभुवन, रेहान शेख, अभिजीत परेकर आणि अनिल काकडे यांचा समावेश आहे. आरोपींनी पोलिसांना पाहून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.
शहरातील वार्ड क्रमांक दोन परिसरातील सोमनाथ रामदास साळवे याला त्यांनी ३० सप्टेंबरला जीवे मारण्याच्या उद्देशाने बेदम मारहाण केली होती. साळवे हा गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी नगर येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.
याप्रकरणी किरण रामदास साळवे (वय २७, रा. बजरंगनगर) याने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी सोमवारी घटनास्थळी जाऊन केलेली पाहणी व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्यांना आरोपींची माहिती मिळाली. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार ते शहरातील अहिल्यादेवीनगर परिसरात लपून बसले होते. मालेगाव येथे पळून जाण्याच्या ते तयारीत होते. मात्र पोलिस पथकाने तेथे छापा टाकून आरोपींना पकडले.