पाट्यांवरून गाव अन् मराठी भाषाही गायब; एवढेच नाही तर मैलाचे दगडही...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 07:51 IST2025-02-27T07:51:44+5:302025-02-27T07:51:55+5:30
महामार्गावर किंवा ग्रामीण भागात प्रवास करताना प्रवासी अनेकदा अनोळखी ठिकाणी पोहोचतात. अशावेळी समोर दिसणाऱ्या दुकानांच्या पाट्यांवर गावाचा उल्लेख नसल्याने ते कोणत्या गावात आहेत, हे समजत नाही.

पाट्यांवरून गाव अन् मराठी भाषाही गायब; एवढेच नाही तर मैलाचे दगडही...
- अरुण वाघमोडे
लोकमत न्यूज नेटवर्क
अहिल्यानगर : प्रवास करताना प्रत्येक गावाची ओळख सहज होण्यासाठी दुकाने, हॉटेल्स, व्यावसायिक आस्थापनांवर लावण्यात येणाऱ्या पाट्यांवर गावाच्या नावाचा उल्लेख असणे महत्त्वाचे आहे. मात्र, महाराष्ट्रातील बहुतांश भागांत अपवाद वगळता गावाच्या नावाचा उल्लेख दिसत नाही. तसेच पाट्या मराठीत आणि देवनागरी लिपीत असाव्यात, असा शासनाचा नियम असतानाही सर्वत्र इंग्रजी अक्षरांतील पाट्याच झळकताना दिसतात.
महामार्गावर किंवा ग्रामीण भागात प्रवास करताना प्रवासी अनेकदा अनोळखी ठिकाणी पोहोचतात. अशावेळी समोर दिसणाऱ्या दुकानांच्या पाट्यांवर गावाचा उल्लेख नसल्याने ते कोणत्या गावात आहेत, हे समजत नाही. तसेच इंग्रजी पाट्या वाचता न येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना अनेकदा गैरसोयीचा सामना करावा लागतो.
नियम काय सांगतो?
महाराष्ट्र शासनाच्या २०२२ च्या आदेशानुसार सर्व दुकाने, व्यावसायिक आस्थापने आणि व्यापारी संकुलांवरील पाट्या मराठीत आणि देवनागरी लिपीत असाव्यात. मात्र, या नियमाची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही.
नियमांसंदर्भात महापालिका २ आणि स्थानिक प्रशासनाने विशेष पथके तयार करून कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात याबाबत कोणतीही ठोस अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे अनेक व्यावसायिक पाट्यांबाबतच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत आहेत.
मैलाचे दगडही गायब
मैलाचा दगड म्हणजे रस्त्याच्या कडेला लावलेला एक क्रमांकित मार्कर. यावर गावाचे नाव आणि अंतराचा उल्लेख असतो. मात्र, बहुतांशी रस्त्यांवरील असे मैलाचे दगड गायब झालेले दिसतात. नवीन रस्ता तयार झाल्यानंतर बांधकाम विभागाच्या वतीने दिशादर्शक फलक लावले जातात. मात्र, अनेक ठिकाणी रस्त्यावरील हे फलकही दिसत नाहीत. परिणामी, प्रवाशांना गुगल मॅपवर गाव शोधावे लागते किंवा स्थानिक लोकांकडे गाव कोणते अशी विचारणा करावी लागते. विशेषतः रात्रीच्या वेळेस किंवा इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसताना ही समस्या अधिक जाणवते.