दीड हजार अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण
By चंद्रकांत शेळके | Updated: August 10, 2023 21:43 IST2023-08-10T21:43:12+5:302023-08-10T21:43:59+5:30
येथील आर्मर्ड कोर सेंटर ॲण्ड स्कूलमध्ये शनिवारी (दि. ५) या अग्निवीरांची पासिंग आउट परेड झाली.

दीड हजार अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण
अहमदनगर : अग्निपथ योजनेंतर्गत भरती झालेल्या देशभरातील १ हजार ५४७ अग्निवीरांच्या पहिल्या तुकडीचे प्रशिक्षण येथील आर्मर्ड कोअर सेंटर ॲण्ड स्कूलमध्ये पूर्ण झाले. हे जवान आता देशातील विविध रेजिमेंटमध्ये सहभागी होऊन राष्ट्रसेवेसाठी सज्ज झाले आहेत.
येथील आर्मर्ड कोर सेंटर ॲण्ड स्कूलमध्ये शनिवारी (दि. ५) या अग्निवीरांची पासिंग आउट परेड झाली. त्यात त्यांना देशसेवेची शपथ देण्यात आली. परेडमध्ये अग्निवीरांनी सैन्य संगीतावर कदम ताल करत शिस्तप्रिय प्रदर्शन केले. आर्मर्ड कोर सेंटर ॲण्ड स्कूलचे कमांडंट मेजर जनरल अनिल राज सिंह कहलो यांनी या परेडचे निरीक्षण केले. नव्याने दाखल झालेल्या अग्निवीरांनी ३१ आठवड्यांचे प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल त्यांनी अग्निवीरांना शुभेच्छा दिल्या.
सैन्य प्रशिक्षणांतर्गत ड्रायव्हिंग अँड मेंटनेंस ट्रेनिंग, तसेच अद्ययावत प्रशिक्षण दोन टप्प्यांत देण्यात आले. आता हे अग्निवीर जवान कुशल टँकमॅन म्हणून सैन्यात दाखल झाले आहेत. पुढील कालावधीत हे सर्व जवान विविध रेजिमेंटमध्ये देशसेवा करणार आहेत. यावेळी उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या अग्निवीरांना मेजर जनरल अनिल राज सिंह कहलो यांच्या हस्ते पदक देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर, अग्निवीरांच्या परिवारातील सदस्यांनाही सन्मानित करण्यात आले.