तंटामुक्त अभियानासाठी ३० आॅगस्टची मुदत
By Admin | Updated: August 17, 2014 00:03 IST2014-08-16T23:44:58+5:302014-08-17T00:03:32+5:30
राहुरी : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत भाग घेऊ इच्छिणा-या समित्यांच्या स्वातंत्र्यदिनी सभा संपन्न झाल्या़

तंटामुक्त अभियानासाठी ३० आॅगस्टची मुदत
राहुरी : महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत भाग घेऊ इच्छिणा-या समित्यांच्या स्वातंत्र्यदिनी सभा संपन्न झाल्या़ येत्या ३० आॅगस्टपर्यंत ठराव पारीत करून जिल्हा पोलीस प्रमुखांकडे पाठविण्यात येणार आहेत़ यंदा अभियानाचे आठवे वर्ष असून जिल्ह्यातून १२०० ठराव अपेक्षित आहेत़
महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी ग्रामसभेत गाव तंटामुक्त अभियानात सहभागी असल्याचा ठराव पारीत करून तालुका स्तरीय पोलीस स्टेशनला पाठवायचे आहेत. त्यानंतर जिल्हा पोलीसप्रमुख कार्यालयात ठराव पाठविण्यात येणार आहेत़
गेल्या वर्षी अभियानात १२०५ गावांनी सहभाग नोंदविला होता़
महात्मा गांधी तंटामुक्त अभियानात जिल्हांतर्गत समितीने पाहणी करून गावांची निवड केली आहे़ जिल्हाबाह्य समिती नगर जिल्ह्याचा पाहणी दौरा करून निवड झालेल्या गावांचा अहवाल राज्य शासनाच्या गृह खात्याकडे पाठविणार आहे़ राज्यात तंटामुक्त अभियानात १५ हजार ३३ गावे तंटामुक्त झाले आहेत़ नगर जिल्ह्यातही निम्म्यापेक्षा अधिक गावे तंटामुक्त झाले आहेत़ तंटामुक्त गाव मोहिमेत यशस्वी होणाऱ्या गावांना शासनाच्या वतीने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे़ (तालुका प्रतिनिधी)
पुरस्कार रखडले
महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत सहभागी झालेल्या गावांचे गेल्या वर्षीचे पुरस्कार रखडले आहेत़ क्रांतीदिनी ९ आॅगस्ट रोजी मुंबई येथे पुरस्काराची घोषणा करून संकेतस्थळावर माहिती दिली जाते़ यंदा मात्र पुरस्काराची घोषणा झालेली नाही़ त्यामुळे १५ आॅगष्ट रोजी पुरस्कार वितरणाला ब्रेक बसला आहे़ गेल्यावर्षी अभियानात सहभागी झालेल्या गावांना आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी पुरस्कार देण्यात यावे, अशी मागणी बारागाव नांदूर तंटामुक्त गाव मोहीम समितीचे अध्यक्ष शिवाजीराव पवार यांनी केली.