आयटी पार्कसाठी लवकरच निविदा

By Admin | Updated: July 1, 2014 00:17 IST2014-06-30T23:36:24+5:302014-07-01T00:17:37+5:30

अहमदनगर: येथील नागापूर औद्योगिक वसाहतीतील आयटी पार्कच्या इमारतीवरील धूळ झटकण्याची चिन्हे आहेत़

Tender for IT Park soon | आयटी पार्कसाठी लवकरच निविदा

आयटी पार्कसाठी लवकरच निविदा

अहमदनगर: येथील नागापूर औद्योगिक वसाहतीतील आयटी पार्कच्या इमारतीवरील धूळ झटकण्याची चिन्हे आहेत़ औद्योगिक विकास महामंडळाने आयटी पार्कमधील गाळ्यासाठी निविदा नोटीस प्रसिध्द करण्याचे आदेश नाशिक येथील कार्यकारी अभियंत्यांना दिले असून, लवकरच यासाठीची निविदा नोटीस प्रसिध्द होणार आहे़ त्यामुळे आयटी उद्योजकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत़
नागापूर औद्योगिक वसाहतीत आयटी उद्योगासाठी आयटीपार्क उभारण्यात आला आहे़ सुमारे दीड कोटी रुपये खर्च करून ही इमारत उभारण्यात आली़ परंतु ही इमारत आजही आयटी उद्योगाच्या प्रतीक्षेत आहे़औद्योगिक विकास महामंडळाकडून आयटी उद्योगासाठी प्रयत्न झाले़ परंतु त्यास प्रतिसाद मिळाला नाही़ आयटी उद्योजक न आल्याने ही इमारत बंद अवस्थेत पडून आहे़ नगर शहरातील आयटी क्षेत्रातील उद्योजकांनी एकत्र येऊन इमारतीची मागणी केली होती़ परंतु औद्योगिक विकास महामंडळाने ही मागणी फेटाळून लावली़ आयटी पार्कमधील गाळ्यांसाठी प्रथमच निविदा नोटीस प्रसिध्द करण्याचा निर्णय घेतला़ त्यामुळे उद्योजकांनी केलेली मागणी मागे पडली असून, निविदा नोटीस प्रसिध्द करण्याच्या हालचालींना वेग आला आहे़ तशा सूचना नाशिक येथील कार्यकारी अभियंता पी़आऱ बंडोपिया यांना नुकत्याच झालेल्या बैठकीत देण्यात आल्या आहे़ त्यानुसार येत्या तीन दिवसांत ही निविदा नोटीस वृत्तापत्रातून प्रसिध्द केली जाणार असल्याचे सांगण्यात आले़
ही इमारत आयटी उद्योगांसाठी आरक्षित आहे़ मध्यंतरी आरक्षण बदलण्याचे प्रयत्न झाले़ परंतु प्रशासन आयटी उद्योगावर ठाम असून, त्यासाठी प्रथमच निविदा नोटीस प्रसिध्द केली जात आहे़
निविदा नोटीस प्रसिध्द करण्यास काही उद्योजकांचा विरोध होता़ कारण यापूर्वी कधीही निविदा काढण्यात आली नाही़ मग आयटी पार्कमधील गाळ्यांसाठीच निविदा का, असा प्रश्न उद्योजकांकडून उपस्थित केला जात आहे़ आयटी पार्क ठेकेदारांच्या घशात घालण्यासाठी निविदेचा आग्रह धरला जात असल्याचा आरोप उद्योजकांकडून करण्यात येत आहे़ उद्योजकांचा विरोध डावलून ८० गाळ्यांसाठी निविदा नोटीस प्रसिध्द करण्यात येत असून, त्यास प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा प्रशासनाला आहे़
मात्र यावेळी निविदेचे दर मोठ्याप्रमाणात वाढविल्याने त्यास प्रतिसाद मिळणे अशक्य आहे, असे स्थानिक उद्योजकांचे म्हणणे आहे़ त्यामुळे आयटी पार्कच्या निविदेबाबत उद्योजकांत कमालीची उत्सुकता आहे़
(प्रतिनिधी)
नुकत्याच झालेल्या बैठकीत कार्यकारी अभियंत्यांना नगरच्या आयटीपार्कसाठी निविदा नोटिस प्रसिध्द करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत़ त्यानुसार या विभागाकडून निविदेची तयारी करण्यात येत असून, लवकरच निविदा वृत्तपत्रातून जाहीर केली जाईल़
-रामदास खेडकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक
निविदा नोटिस प्रसिध्द करण्याबाबतचा निर्णय महामंडळाने घेतलेला आहे़ परंतु निविदेबाबत अद्याप कळविण्यात आले नाही़ निविदा नोटिस प्रसिध्द झाल्यास नगरच्या आयटी उद्योगाला चालना मिळेल,अशी अपेक्षा आहे़
—अशोक सोनवणे, अध्यक्ष,
आमी संघटना.

Web Title: Tender for IT Park soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.