अहमदनगरला एकाच महिन्यात दहा हजार मुले बाधित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:17 IST2021-06-02T04:17:42+5:302021-06-02T04:17:42+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात मे महिन्यात शून्य ते अठरा वयोगटातील दहा हजार मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. एकूण बाधित रुग्णांच्या ...

अहमदनगरला एकाच महिन्यात दहा हजार मुले बाधित
अहमदनगर : जिल्ह्यात मे महिन्यात शून्य ते अठरा वयोगटातील दहा हजार मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. एकूण बाधित रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण साडेअकरा टक्के आहे. मात्र, मुलांची प्रतिकारशक्ती चांगली असल्याने ते प्राथमिक उपचार घेऊन बरे होत आहेत, असे जिल्हा प्रशासनाने सांगितले.
एप्रिल आणि मे या दोन महिन्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर होती. एकट्या एप्रिल महिन्यामध्ये अहमदनगर जिल्ह्यामध्ये ८० हजार, तर मे महिन्यात ८७ हजार कोरोनाबाधित आढळले. या दोन महिन्यांत रुग्ण बाधित होण्याचा दर हा अनुक्रमे ४२ व ५१ टक्के होता. दरम्यान, या बाधितांत मुलांचीही संख्या मोठी आढळली आहे. मे महिन्यात ८७ हजार रुग्णांपैकी दहा हजार मुले बाधित आढळली. हे प्रमाण एकूण रुग्णांच्या तुलनेत साडेअकरा टक्के आहे.
जिल्हा प्रशासनाने या आकडेवारीस दुजोरा दिला आहे. दुसऱ्या लाटेत एकाच कुटुंबातील सर्व व्यक्ती बाधित होण्याचे प्रमाण वाढलेले होते. त्यामुळे लहान मुलेही बाधित झाली, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांनी सांगितले. लहान मुलांचे प्रमाण जास्त आढळल्याने मुलांसाठी विशेष कक्ष स्थापन करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
------
मे महिन्यात बाधित आढळलेल्या मुलांचे वर्गीकरण
० ते १ वर्षे - ८९
१ ते १०- ३,०८१
११ ते १८ - ६,८५५
एकूण - १०,०२५
.............
बाधित मुलांमध्ये दहा वर्षांखालील मुलांचे प्रमाण हे एकूण रुग्णांच्या तुलनेत केवळ साडेतीन टक्के आहे, तर त्यापेक्षा थोडी मोठी मुले म्हणजे अकरा ते अठरा वयोगटाचे प्रमाण सुमारे आठ टक्के आहे. त्यामुळे पालकांनी घाबरून जाऊ नये. प्रत्येकाने काळजी मात्र घ्यावी.
- डॉ. संदीप सांगळे, जिल्हा आरोग्य अधिकारी
.............
मुलांचे प्रमाण कमी : प्रदीप व्यास
राज्यात गेल्या सहा महिन्यांत आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीचे विश्लेषण केले असता, लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग होण्याच्या प्रमाणात फारसा बदल आढळून आलेला नाही. कोरोना बाधितांत १८ वर्षांखालील मुलांचे प्रमाण राज्यात मे २०२१ मध्ये ०.०७ टक्के आहे. यावरून या मुुलांत आजाराचे प्रमाण कमी आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुले बाधित होण्याचा अंदाज असल्याने टास्क फोर्स स्थापन केला असून, बालकांवरील उपचारासाठी पायाभूत सुविधांची पूर्वतयारी सुरू असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.