सांग..सांग भोलानाथ शाळा भरेल काय? मित्र पुन्हा भेटतील काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:20 IST2021-08-01T04:20:10+5:302021-08-01T04:20:10+5:30
अहमदनगर : सांग सांग भोलानाथ। पाऊस पडेल काय? शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय? कधी काळी अशा पद्धतीने सुट्टीसाठी ...

सांग..सांग भोलानाथ शाळा भरेल काय? मित्र पुन्हा भेटतील काय?
अहमदनगर : सांग सांग भोलानाथ। पाऊस पडेल काय? शाळेभोवती तळे साचून सुट्टी मिळेल काय? कधी काळी अशा पद्धतीने सुट्टीसाठी भोलानाथकडे याचना करणारे बालचमू आता शाळेत जाण्यासाठी आणि मित्रांना भेटण्यासाठी आतूर झाले आहेत. शाळेतील मित्र अन् त्यांच्यासोबतची दंगामस्ती, एकत्र खेळणे, डबा खाणे हे सर्व काही आम्ही खूप मिस करतोयत, आम्हाला आता शाळेत जाऊ द्या, अशी आर्त विनवणी घराघरातील मुले माता-पित्यांकडे करत आहेत.
वय कोणतेही असो, आयुष्यातील महत्त्वाच्या आणि जवळच्या नात्यांपैकी एक खास नाते म्हणजे ‘मैत्री’. माया, प्रेम, जिव्हाळा आणि मनातील भावभावना मित्रांजवळच व्यक्त केल्या जातात. कळत्या वयात वृद्धिंगत झालेल्या मैत्रीची सुरुवात ही बालवयातच झालेली असते. त्यामुळे शालेय जीवनातील मैत्री प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची ठरते. कोरोनामुळे मात्र गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद असल्याने लहान मुलांचे मित्र त्यांच्यापासून दुरावले आहेत. लहान मुले घरी थांबून कंटाळले आहेत. यातून अनेक मुलांचा स्वभाव चिडचिडा झाला आहे. स्कूल व्हॅन, शाळेतील प्रार्थना, मधली सुट्टी, दुपारचे जेवण अन् मित्रांसोबतची दंगामस्ती या सर्व आठवणी डोळ्यासमोर येतात. कधी आमची शाळा सुरू होईल, असा प्रश्न मुलांना पडला आहे.
----------------------
रोज घरातच थांबावे लागते. ऑनलाइन क्लासलाही मन लागत नाही. शाळेतील मित्रांची खूप आठवण येते. अनेक मित्रांचे मोबाइल क्रमांक माझ्याकडे नाहीत, त्यामुळे त्यांच्याशी बोलताही येत नाही. शाळा लवकर सुरू व्हावी म्हणजे आम्हाला पुन्हा एकदा सर्व मित्रांना भेटता येईल.
- रुद्र बोरुड, इयत्ता चौथी
---------------------------
आधी शाळेत जायचा खूपच कंटाळा यायचा. सुट्टी मिळावी, असे वाटायचे. आता मात्र सुट्टीचाच कंटाळा आलाय. मित्रांना फोन केला तरी जास्त वेळ बोलता येत नाही. मला मित्रांसोबत खूप बोलायचे आहे. सुट्टीत केलेले प्रोजेक्ट त्यांना दाखवायचे आहेत. पण शाळाच सुरू होत नाही.
- कृष्णा बाचकर, इयत्ता तिसरी
---------------------
फोटो- ३१ मित्र