साहेबराव नरसाळे , अहमदनगर अहमदनगर जिल्ह्याने अनेक मॉडेल राज्यालाच नव्हे तर देशालाही दिले़ राष्ट्रीय स्तरावर पोहोचलेल्या अनेक योजनाही दिल्या़ संशोधनातही जिल्हा मागे नाही़ १९९० मध्ये अतिशय तोकड्या साधनांच्या जिवावर एका शेतकर्याने शेती विकासासाठी तंत्रज्ञान विकसीत केले आणि त्याचे पेटंटही मिळविले़ विशेष म्हणजे, राज्य सरकारने या शेतकर्याचा संशोधक म्हणून गौरवही केला़ मारुतराव यशवंतराव सरोदे असे या शेतकर्याचे नाव आहे़ मात्र, आज हा संशोधक विस्मृतीत गेला आहे़ नगर जिल्ह्याला सहकारी साखर कारखान्याचा मोठा इतिहास आहे़ सहकार चळवळ नगर जिल्ह्यात रुजली आणि वाढली़ त्यामुळे नगरचे नाव आशियाखंडात पोहोचले़ मात्र, याच जिल्ह्यातील पहिला संशोधक शेतकरी म्हणून ज्याचा सरकारने गौरव केला अशा मारुतराव सरोदे यांचे नावही जिल्ह्याला माहिती नाही़ सरोदे यांनी १९९० साली भुईमूग शेंग विभाजक यंत्र विकसीत केले़ डिसेंबर १९९० साली सरोदे यांना या तंत्रज्ञानाचे पेटंटही (पेटंट क्रमांक- १७५८६४) मिळाले़ या यंत्राच्या यशानंतर राज्य सरकारने सरोदे यांना संशोधक शेतकरी म्हणून गौरविले़ भुईमूग शेंग विभाजक यंत्रामध्ये त्यांनी पुढे अनेक बदल केले़ हे यंत्र देशभरातील शेतकर्यांना उपयुक्त ठरले़ २००१ साली केंद्र सरकारच्या नॅशनल इनोव्हेशन फौंडेशनने आयोजित केलेल्या मूळ संशोधन स्पर्धेत सरोदे यांच्या यंत्राला प्रथम पारितोषिक देण्यात आले़ फौंडेशनने संशोधक शेतकर्यांच्या यादीत सरोदे यांना मानाचे स्थान दिले़ एव्हढेच नाही तर या फौंडेशनने सरोदे यांच्या यंत्राचा प्रसारही केला़ भुईमूग शेंग विभाजक यंत्र तयार करण्यासाठी सरोदे यांना मारुतराव कदम (चांभार) व गंगाराम साकवे (सुतार) या दोन मित्रांनी मदत केली़ कदम व साकवे हे दोघेही त्यांचे काम आटोपून रात्री उशीरापर्यंत सरोदे यांना हे यंत्र बनविण्यासाठी मदत करीत होते, असा उल्लेख नॅशनल इनोव्हेशन फौंडेशनच्या संशोधक इतिहासात सापडतो़यंत्रापासून दोन माणसांच्या मदतीने एकरभर शेंगा एका दिवसात झाडापासून वेगळ्या होऊ लागल्या़ आजही ग्रामीण भागात भुईमूगाच्या शेंगा झाडापासून वेगळ्या करण्यासाठी हाताने तोडाव्या लागतात़ भुईमूगाचे एक-एक झाड हातात घेऊन शेंगा तोडणे हे अतिशय किचकट काम आहे़ शेतकर्यांचे हे काम सोपे व्हावे, यासाठी सरोदे यांनी फिरत्या ब्लेडचा वापर करुन भुईमूग शेंग विभाजक यंत्र विकसीत केले़ या यंत्रापासून दोन माणसांच्या मदतीने एकरभर शेंगा एका दिवसात झाडापासून वेगळ्या होऊ लागल्या़ जिनींग मशिनचा शोध सरोदे हे काही कामानिमित्त इंदोर येथे गेले असता, त्यांनी कापूस पिंजण्याचे काम कसे चालते हे पाहिले़ नेहमी नवीन गोष्टींचा शोध घेणार्या सरोदे यांनी त्याचवेळी कापूस पिंजण्याचे मशिन विकसीत करण्याचा निर्णय घेतला़ भुईमूग शेंग विभाजक यंत्र हे सरोदे यांचे पहिले संशोधन होते़ त्यानंतर सुमारे सहा वर्षांनी सरोदे यांनी जिनींग मशीन तयार केले़ या मशिनला त्यांनी १२०० टोकदार नेल्स, लाकडी स्ट्रिप्स, शिफ्टींग बेअरिंग, चेन पॉकेट, पुली बसविले़ त्यामुळे ६० ते १०० राऊंड पर मिटरने वेगाने ही मशिन काम करु लागली़ केवळ एक व्यक्ती ही मशीन चालवू शकत होता़ सुमारे १२ वर्षे त्यांनी ही मशिन चालविली़ सरोदे यांना मशिन विकसीत करण्यासाठी अनेक साधनांची आवश्यकता होती़ स्थानिक पातळीवर त्यांना ही साधने व साहित्य उपलब्ध होत नव्हते़ नगरमधून मिळेल तेव्हढे साहित्य खरेदी केले़ उर्वरित साहित्य मुंबईच्या लोखंड बाजारातून खरेदी केले होते़
तंत्रज्ञानाचा उद्गाता...संशोधक शेतकरी विस्मृतीत!
By admin | Updated: May 11, 2014 00:45 IST