समाजमन वाचण्याची शिकवण गुरूकडूनच
By Admin | Updated: July 12, 2014 01:11 IST2014-07-11T23:30:38+5:302014-07-12T01:11:15+5:30
अहमदनगर : गुरू प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक असतो. भरकटलेल्या समाजजीवनात सामाजिक मूल्ये जागृत करण्याचे काम गुरूकडून होते.
समाजमन वाचण्याची शिकवण गुरूकडूनच
अहमदनगर : गुरू प्रत्येकाच्या जीवनातील अविभाज्य घटक असतो. भरकटलेल्या समाजजीवनात सामाजिक मूल्ये जागृत करण्याचे काम गुरूकडून होते. ज्याने त्याने आपापल्या गुरूकिल्लीने यशाचे दरवाजे उघडलेले असतात. त्यामुळे त्या किल्लीची जपणूक आपसूकच त्यांच्याकडून होते. विविध क्षेत्रांतील अशाच यशस्वीतांकडून त्यांच्या गुरूंना गुरूपौर्णिमेनिमित्त मिळालेली ही गुरूदक्षिणा...
समाजमन वाचण्याची शिकवण
समाजाबद्दल कणव असणारा, शिष्याला भरभरून देणारा सधन गुरू असावा. आजचा बालक हा उद्याचा राष्ट्रचालक असल्याने शिक्षकाची, गुरूची जबाबदारी आणखीच वाढते. माझ्या गुरूने मला प्रामाणिकपणा, नैतिकता शिकवली. जगात करण्यासारखे खूप आहे. त्यासाठी प्रथम तुम्ही त्याच्याजवळ जायला हवे. समाजमनाचा अभ्यास करून योग्य ती कृती करणं हे शिक्षकाचं कर्तव्य आहे. प्रगती, विकास या गोष्टी स्वत:च्या कोषापुरत्या मर्यादित न राहता, त्याच्या कक्षा रूंदावण्याची महत्वपूर्ण शिकवण मला गुरूंकरून मिळाली.
- डॉ. बाळ कांबळे, प्राचार्य, दादा पाटील कॉलेज, कर्जत
आयुष्यभराची शिदोरी
आयुष्यभर पुरेल एवढी शिदोरी मला गुरू र. बा. केळकर यांच्याकडून मिळाली. ते माझेच नव्हे, तर माझ्या वडिलांचे व मुलाचेसुद्धा गुरू होते. केळकर सर साने गुरूजींचे शिष्य. वडील त्यांच्याकडे कलेचे धडे घेण्यासाठी जात असत, त्यामुळे मलाही लहानपणापासूनच कलेची आवड निर्माण झाली आणि हे हेरून केळकर सरांनी त्याला पैलू पाडण्याचे काम केले. स्वत:च्या घरात प्रगत कला केंद्र सुरू करून त्यांनी ज्ञानाचे धडे दिले. त्यांचे मोलाचे संस्कार, शिकवण घेऊन आज आम्ही उभे आहोत.
- प्रमोद कांबळे, शिल्पकार, चित्रकार
लोकसाहित्याचा संशोधक
हरिभाऊ फडके यांच्यामुळे संत साहित्य आणि गंगाधर मोरजे यांच्याकडून लोकसाहित्याची प्रेरणा मिळाल्याने मला लोकसाहित्याचा संशोधक म्हणून ओळख मिळाली. फडके गुरूजींनी आठवीपासून ते शिक्षक होईपर्यंत पाठबळ दिलं. पुढे पीएच.डी. झाल्यानंतर त्यांनी दिलेल्या गुरूदेव रानडे यांच्या एका पुस्तकातून मला ज्ञानेश्वरीवर लिखाण करण्याची प्रेरणा मिळाली व ‘ज्ञानेश्वरीतील साहित्य विचार’ हा ग्रंथ साकार झाला. शिक्षणाच्या वाटेवर असताना दुसरे गुरू मिळाले ते मोरजे सर. लोकसाहित्याचं संशोधन कसं करावं, याची प्रेरणा व मार्गदर्शन त्यांच्यामुळे मिळाल्याने मला राज्यात लोकसाहित्याचा संशोधक म्हणून ओळख मिळाली.
- डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे, संत साहित्याचे अभ्यासक
आंतरराष्ट्रीय ओळख
प्रा. सुनील जाधव व ई. प्रसादराव यांनी दिलेल्या धड्यांमुळे कबड्डीत आपल्याला आंतरराष्ट्रीय ओळख मिळाली. खेळाची आवड तशी लहानपणापासूनच होती. पण माझ्यातील खिलाडूवृत्ती, नेतृत्व ओळखण्याचं व त्याला खरे पैलू पाडण्याचे काम या दोघा गुरूंनी केले. त्यामुळे कबड्डी संघाचे राष्ट्रीय नेतृत्व करण्याचा मान मिळाला. महाविद्यालयीन जीवनात व नंतर विविध ठिकाणी स्पर्धेनिमित्त जाताना या दोघांचे मार्गदर्शन क्षणोक्षणी उपयोगी पडले. त्यातून मीच नाही, तर माझा संघ उत्कृष्ट कामगिरी करू शकला.
- पंकज शिरसाठ, भारतीय कबड्डी संघाचा माजी कर्णधार
आई-वडिलांचं स्थान मोठं
साऊंड डिझायनर म्हणून बॉलिवूडमध्ये नाव कमावण्यात, मला घडवण्यात माझे पहिले गुरू आई-वडील यांचे अढळ स्थान आहे. त्याचबरोबर प्रा. सतीशकुमार व प्रा. रामटेके यांनी ध्वनी तंत्रज्ञानापासून ते आवाजापर्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. अजूनही ते सुरूच आहे. साऊंड डिझायनर म्हणून ‘इश्किया’ चित्रपटाद्वारे राष्ट्रीय पुरस्काराने गौरव झाला. त्याचे सर्व श्रेय या गुरूंना जाते. आताशी करिअरची सुरूवात आहे. गुरूंची प्रेरणा व मार्गदर्शनाने अजून अनेक टप्पे पार करायचे आहेत.
- कामोद खराडे, साऊंड डिझायनर