शिक्षकांचे प्रश्न शासनदरबारी मांडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:19 IST2021-02-15T04:19:41+5:302021-02-15T04:19:41+5:30
अहमदनगर : शासकीय सेवेत काम करणाऱ्यांच्या आरोग्याची काळजी शासनाने घेतली पाहिजे, असे सांगून शिक्षकांचे प्रश्न शासनदरबारी मांडणार असल्याचे आश्वासन ...

शिक्षकांचे प्रश्न शासनदरबारी मांडणार
अहमदनगर : शासकीय सेवेत काम करणाऱ्यांच्या आरोग्याची काळजी शासनाने घेतली पाहिजे, असे सांगून शिक्षकांचे प्रश्न शासनदरबारी मांडणार असल्याचे आश्वासन मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिले.
येथील मंगल कार्यालयात रविवारी झालेल्या गुरुकुल शिक्षक मंडळ व शिक्षक समितीच्या मेळाव्यात गडाख बोलत होते. शिक्षण समितीचे राज्याध्यक्ष उदय शेळके, सांस्कृतिक समितीचे राज्याध्यक्ष संजय कळमकर, राज्य उपाध्यक्ष रा. या. औटी, जिल्हाध्यक्ष संजय धामणे, नितीन काकडे, सुदर्शन शिंदे, सतिराम सावंत, गुरुकुल महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वृषाली कडलग, इमाम सय्यद आदी उपस्थित होते. मंत्री गडाख म्हणाले, सन २००५ नंतर रुजू झालेल्या शिक्षकांना पेन्शन मिळत नाही, यासह विविध प्रश्न शिक्षकांनी नेमकेपणाने मांडले. शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत राज्यस्तरीय समिती स्थापन करावी. शिक्षकांच्या प्रश्नाबाबत लवकरच बैठक घेऊ. ही बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत घेण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे गडाख म्हणाले.
यावेळी समितीचे नेते कळमकर आपल्या भाषणात म्हणाले, आमदारांना पेन्शन मिळते. परंतु, आमदारांना घडविणाऱ्या शिक्षकांना पेन्शन मिळत नाही. सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य जगणे कठीण होते. त्यामुळे शिक्षकांना पेन्शन लागू करावी, अशी मागणी कळमकर यांनी यावेळी केली
...
विधान परिषदेवर शिक्षकांना संधी द्यावी
शिक्षकांचे प्रश्न शासनदरबारी मांडण्यासाठी विधान परिषदेवर एका शिक्षकाची आमदार म्हणून नेमणूक करावी, अशी मागणी संजय कळमकर यांनी मेळाव्यात केली.