अशैक्षणिक कामांविरोधात शिक्षकांचा पुण्यात आयुक्त कार्यालयावर महामोर्चा; नवभारत साक्षरता सर्वेक्षणाला विरोध
By चंद्रकांत शेळके | Updated: December 27, 2023 20:00 IST2023-12-27T20:00:20+5:302023-12-27T20:00:42+5:30
केंद्र व राज्य सरकारने नवभारत साक्षरता अभियान सर्वेक्षणाचे काम राज्यातील प्राथमिक शिक्षकांना देऊन शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करण्याचा सपाटा लावला आहे.

अशैक्षणिक कामांविरोधात शिक्षकांचा पुण्यात आयुक्त कार्यालयावर महामोर्चा; नवभारत साक्षरता सर्वेक्षणाला विरोध
अहमदनगर : केंद्र व राज्य सरकारने नवभारत साक्षरता अभियान सर्वेक्षणाचे काम राज्यातील प्राथमिक शिक्षकांना देऊन शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करण्याचा सपाटा लावला आहे. हे काम राज्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी नाकारले असतानाही शिक्षण संचालक मात्र धमकीवजा आदेश देतात. या विरोधात राज्यातील २४ संघटनांच्या प्राथमिक शिक्षक मध्यवर्ती संघटनेने बुधवारी शिक्षण आयुक्तालयावर महामोर्चा काढला. शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष केशवराव जाधव, शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष राजेश सुर्वे, शिक्षक नेते बापूसाहेब तांबे, अखिल महाराष्ट्र शिक्षक संघाचे सरचिटणीस कल्याण लवांडे, नपा मनपा शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष अर्जुन कोळी व इतर प्रमुख संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.
नवभारत साक्षरता अभियान आता कालबाह्य झाले आहे. त्याच्यावर आपली शक्ती खर्च करण्याऐवजी केंद्र व राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत. शाळांमधून विविध उपक्रम राबविण्यात यावेत. नवभारत साक्षरतेचे काम २०२७ पर्यंत चालणार आहे. शिक्षक जर या कामाला जुंपला गेला तर त्याचे शालेय अध्यापनाकडे दुर्लक्ष होऊन भावी पिढीचे नुकसान होणार आहे. म्हणून हे काम शिक्षकांना देण्यात येऊ नये या प्रमुख मागणीसाठी हा मोर्चा होता. त्याचबरोबर जुनी पेन्शन योजना लागू करावी, नगरपालिका शिक्षकांना शंभर टक्के वेतन अनुदान द्यावे या व इतर अनेक प्रमुख मागण्यांच्या संदर्भात देखील मोर्चातर्फे निवेदन देण्यात आले. शिक्षण संचालक (योजना) महेश पालकर यांनी निवेदन स्वीकारून आपल्या भावना केंद्र व राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले.