शिक्षक बँक झाली पतसंस्था

By Admin | Updated: June 23, 2014 00:06 IST2014-06-22T23:20:38+5:302014-06-23T00:06:22+5:30

कळमकर : बँकेच्या धोरणावर टीका

The teacher came back to the bank | शिक्षक बँक झाली पतसंस्था

शिक्षक बँक झाली पतसंस्था

अहमदनगर : शिक्षक बँकेने सर्व प्रकारातील कर्ज पुरवठा बंद केल्याने सत्ताधारी संचालक मंडळाचे पितळ उघडे पडले आहे. पगाराची वसुली आली तरच कर्ज अशी विचित्र अवस्था संचालक मंडळाने बँकेची केली आहे. यामुळे ही बँक आता बँक नव्हे तर पतसंस्था बनली असल्याची टीका शिक्षक नेते संजय कळमकर आणि गुरूकुल मंडळाचे जिल्हाध्यक्ष नितीन काकडे यांनी केली आहे.
ते म्हणाले की, सर्व प्रकारातील कर्ज पुरवठा बंद करण्याची नामुष्की ओढवणे ही बँकेच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. दोन महिने पगार नसणाऱ्या शिक्षकांना बँकेने प्रासंगिक कर्ज सुरू ठेवत आर्थिक आधार देणे आवश्यक होते. गुरूकुल मंडळाने त्यांच्या कार्यकाळात दहा टक्के व्याजदरात १२ लाख रुपयांपर्यंत कर्ज देत सभासदाला आर्थिकदृष्ट्या स्थैर्य दिले. शिक्षकांचेच पैसे घ्यायचे आणि साडेबारा टक्क्यांनी पुन्हा ते शिक्षकांना द्यायचे, असे सावकारी धोरण बँकेकडून सुरू आहे.
तब्बल ८ टक्के फरकाने कारभार करणाऱ्या बँकेचा कोट्यवधी रुपयांचा नफा जातो कुठे, असा प्रश्न त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केला आहे़
शिक्षकांचे वेतन या पुढे राष्ट्रीयकृत बँकेत जमा होणार आहे. कमी व्याजदारात १० ते १२ लाख रुपये कर्ज देण्याची तयारी या बँकांची आहे. त्यावेळेस शिक्षक बँकेचे काय होईल याचे भानही सदिच्छा मंडळाला नाही. आमचा वाईट कारभाराशी संबंध नाही, असे म्हणणाऱ्या सदिच्छा मंडळाच्या दुसऱ्या गटाला ही जबाबदारी टाळता येणार नाही. बँकेत या वाईट प्रवृत्तींना नेऊन बसविण्यास तेच कारणीभूत असल्याची टीका यावेळी करण्यात आली़
बँकेने त्वरित कर्ज पुरवठा सुरू न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा रा. या. औटी, अनिल आंधळे, संजय धामणे, मिलिंद पोटे, राजेंद्र जायभाय, उमेश मेहेत्रे, प्रल्हाद साळुंके, सलीम पठाण यांनी दिला आहे.
(प्रतिनिधी)

Web Title: The teacher came back to the bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.