शिक्षक बँक मयत सभासदांच्या कुटुंबांना देणार आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:22 IST2021-07-28T04:22:17+5:302021-07-28T04:22:17+5:30
अहमदनगर : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांची कामधेनू आहे. या बँकेने शिक्षकांचे प्रपंच आणि ...

शिक्षक बँक मयत सभासदांच्या कुटुंबांना देणार आधार
अहमदनगर : अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी बँक जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांची कामधेनू आहे. या बँकेने शिक्षकांचे प्रपंच आणि शिक्षकांची प्रतिष्ठा उंचावण्याचे काम केलेले आहे. शिक्षक बँकेच्या योजनांचे अनुकरण राज्यात केले जाते. यावर्षी कोरोनामुळे मोठ्या संख्येने सभासद मृत्यूमुखी पडले. बँकेच्या कुटुंब आधार योजनेतून १० लाख तसेच मयत निधीतून पाच लाख रुपयांची मदत दिवंगत सभासदांच्या वारसांना देण्यात येणार आहे, अशी माहिती गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार साळवे यांनी सांगितले.
शिक्षक बँकेतर्फे दिवंगत सभासदांच्या वारसांना कुटुंब आधार निधीतून दहा लाख रुपये व मयत सभासद कर्ज निवारण निधीतून पाच लाख रुपये अशी पंधरा लाखाची भरीव मदत केली जाते. हे दोन्ही निधी सभासदांनी निर्माण केलेले आहेत. यामध्ये बँकेची कोणतीही भूमिका नाही. बँक फक्त वसुली आणि वितरण मध्यस्थ म्हणून काम करते. कुटुंब आधार निधी दरमहा गोळा होतो व त्यातून दरमहा मदत दिली जाते. या निधीमध्ये कोणतीही रक्कम शिल्लक नाही. त्यामुळे कुटुंब आधार निधीमध्ये निधी उपलब्ध करण्यासाठी वार्षिक सभेत पोट नियम दुरुस्ती केली जाणार आहे. कर्ज निवारण निधीमधून सभासदांचे सर्व कर्ज माफ करून वारसांना पाच लाख रुपये मदत दिली जाते. एक एप्रिल रोजी या निधीमध्ये ३ कोटी ३० लाख रुपये शिल्लक होते, त्यातून आतापर्यंत २९ सभासदांचे ३ कोटी १८ लाख रुपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. कोरोना संकटामुळे मागील तीन महिन्यांमध्ये बँकेचे ६० सभासद दिवंगत झाले आहेत. चालू आर्थिक वर्षातील आठ महिने अजून शिल्लक आहेत. दरवर्षी सरासरी १८ ते २० सभासद मृत्यूमुखी पडतात. मात्र कोरोना लाटेने ही संख्या तिप्पट झाली आहे. सर्वांचे कर्ज माफ करून पाच लाख रुपयांची मदत व कुटुंब आधाराची दहा लाख रुपयांची मदत देण्यासाठी एकूण १२ कोटी रुपयांची तर कर्ज माफीसाठी ४ कोटी रुपये असे एकूण १६ कोटी रुपयांची आवश्यकता आहे. सध्या बँकेकडे सव्वातीन कोटी रुपये उपलब्ध आहेत. कमी पडणारा निधी सभासदांकडून उभारावा लागणार आहे. याबाबत जिल्ह्यातील सभासदांशी विचारविनिमय सुरू असून सर्व सभासद निधी देण्यास अनुकूल आहेत. त्यामुळे वार्षिक सभेत निर्णय घेऊन सभासदांच्या वारसांना मदत निश्चित दिली जाणार आहे. कोरोनामुळे कुटुंबातील कर्ती माणसं अचानकपणे निघून गेली आहेत. त्यांना मदत करणे हे आपले प्रत्येकाचे कर्तव्य आहे. किमान या प्रश्नात तरी कोणीही गलिच्छ राजकारण करू नये, असे आवाहनही राजकुमार साळवे यांनी केले आहे.