क्षयरोगाचा विळखा होतोय अधिकच घट्ट
By Admin | Updated: August 1, 2014 00:22 IST2014-07-31T23:29:51+5:302014-08-01T00:22:34+5:30
अहमदनगर : जिल्ह्यात अलिकडच्या काळात क्षय रोगाचा विळखा घट्ट झालेला दिसत आहे. गेल्या तीन महिन्यांत तपासलेल्या ७ हजार ८० लोकांमध्ये १ हजार ६४ क्षय रोगाचे रुग्ण सापडले आहेत.
क्षयरोगाचा विळखा होतोय अधिकच घट्ट
अहमदनगर : जिल्ह्यात अलिकडच्या काळात क्षय रोगाचा विळखा घट्ट झालेला दिसत आहे. गेल्या तीन महिन्यांत तपासलेल्या ७ हजार ८० लोकांमध्ये १ हजार ६४ क्षय रोगाचे रुग्ण सापडले आहेत. यात नवीन आणि जुन्या रुग्णांचा समावेश असून धक्कादायक म्हणजे याच कालावधीत बहुऔषधांना दाद न देणारे (एमडीआर टीबीचे) ९३ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी १२ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. टी बी आणि एचआयव्ही या दोन्ही रोगग्रस्त असणाऱ्यांची संख्या ८३ आहे.
राज्याच्या तुलनेत जिल्ह्यात क्षय रोगाची आकडेवारी कमी असली तरी, जिल्ह्यात टीबी रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, आरोग्य विभागाच्या दाव्यानुसार जिल्ह्यात जिल्हा क्षयरोग विभागाच्या चांगल्या कामगिरीचा परिपाक म्हणजे आढळणाऱ्या या रुग्णांची संख्या वाढलेली आहे. क्षय हा संसर्गजन्य रोग आहे. प्रामुख्याने प्रतिकार शक्ती कमी झालेल्या व्यक्तीला या रोगाचा संसर्ग होतो. अतिरिक्त धूम्रपान, एच. आय. व्ही. आणि लहानपणी प्रतिबंधात्मक लसी न घेतलेल्या क्षय रोगाचा धोका अधिक आहे.
औषधाने पूर्णपणे बरा होणारा हा रोग आहे. यासाठी उपचारांच्या दोन्ही पध्दती नवीन रुग्णाला सहा महिने औषधोपचार तर मधेच उपचार सोडणाऱ्यांवर आठ महिने औषधोपचार करण्यात येतात. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागांतर्गत जिल्हा क्षयरोग नियंत्रण विभाग कार्यरत आहे. तर जिल्हाभर प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी ६२ थुंकी तपासणी केंद्र आहेत. या ठिकाणी संशयीत क्षय रोगग्रस्तांची थुंकी तपासून पुढील उपचार करण्यात येतात. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक पर्यवेक्षक आणि वरिष्ठ प्रयोग शाळा तंत्र कार्यरत आहेत. नगरला जिल्हा क्षयरोग अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली २० खाटांचे रुग्णालय आहे. जिल्ह्यात १ एक लाख रुग्णांमागे १५२ रुग्ण आढळलेले आहेत. एप्रिल ते जून या कालावधीत तपासण्यात आलेल्या ७ हजार ८० रुग्णांमध्ये १ हजार ६४ क्षय रोगाचे रुग्ण आढळलेले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. बहुऔषधांना दाद न देणारे (एमडीआर टीबीचे) ९३ रुग्ण आढळले आहेत. त्यांच्यावर २४ ते २८ महिने औषधोपचार सुरु आहे. यापैकी १२ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. टी बी आणि एचआयव्ही या रोगग्रस्तांची संख्या ८३ आहे. (प्रतिनिधी)
तालुकानिहाय असणारे क्षयरोगग्रस्त
नगर ७६, कर्जत ६२, नेवासा ९९, पारनेर ६५, पाथर्डी ५४, राहाता ९४, संगमनेर १२८, श्रीरामपूर ६५, अकोले ७८, श्रीगोंदा ७५, कोपरगाव ८३, शेवगाव ६८, जामखेड ५१, राहुरी ६६ यांचा समावेश आहे.
दुषित थुंकी असणारे जिल्ह्यात ५६३ रुग्ण आढळलेले आहेत. हे रुग्ण सर्वात घातक असून त्यांच्या थुंकीतून थेट क्षय रोगाचा संसर्ग होत आहे. यात सर्वाधिक राहाता तालुक्यात ६४, सर्वात कमी जामखेड तालुक्यात २४ रुग्ण आढळलेले आहेत.
दोन आठवड्यापेक्षा अधिक खोकला, संध्याकाळी येणारा ताप, खोकल्यातून रक्त पडणे, वजन कमी होणे, छातीत दुखणे, भूक मंदावणे अशी लक्षणे असल्यास जवळच्या सरकारी आरोग्य संस्थेत थुंंकीची तपासणी करून घ्यावी. त्यात काही न आढळल्यास छातीचा एक्सरे काढून घ्यावा.
- एस.डी. पोटे,
जिल्हा क्षय रोग अधिकारी.