भाविकांच्या जिभेवर पुन्हा आमटीची चव रेंगाळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:21 IST2021-01-03T04:21:43+5:302021-01-03T04:21:43+5:30
योगेश गुंड केडगाव : कोरोनामुळे बंद झालेला आगडगाव येथील महाप्रसाद दहा महिन्यांच्या खंडानंतर आजपासून (दि. ३ जानेवारी) सुरू होत ...

भाविकांच्या जिभेवर पुन्हा आमटीची चव रेंगाळणार
योगेश गुंड
केडगाव : कोरोनामुळे बंद झालेला आगडगाव येथील महाप्रसाद दहा महिन्यांच्या खंडानंतर आजपासून (दि. ३ जानेवारी) सुरू होत आहे. आमटी, भाकरी आणि हिरव्या मिरचीचा ठेचा अशा अस्सल गावरान मेनुची चव पुन्हा भाविकांच्या जिभेवर रेंगाळणार आहे. कोरोनाबाबतच्या सर्व उपाययोजनांची अंमलबजावणी करूनच देवस्थानने हा निर्णय घेतला आहे.
नगर शहरापासून १७ किलोमीटर अंतरावर आगडगाव (ता. नगर) येथे भैरवनाथांचे पुरातन मंदिर आहे. मंदिर छोटेच पण टुमदार आहे. मोठे दगड आणि शिळांनी बांधलेले हे मंदिर असून तीर्थक्षेत्र आणि निसर्गरम्य वातावरणामुळे हे पर्यटनस्थळ बनले आहे. दर रविवारी भाविकांची येथे मोठी गर्दी होते. प्रत्येकाला आमटी भाकरीचा महाप्रसाद दर रविवारी देण्यात येतो. भाविकांच्या देणगीतूनच गेल्या १७ वर्षांपासून हा महाप्रसाद देण्याची प्रथा देवस्थान समितीने सुरू केली. मिश्र डाळीची खास येसूर घालून बनविलेली खमंग व चरचरीत आमटी भाविकांच्या पसंतीला उतरली आहे. सोबत बाजरीची भाकरी, हिरव्या मिरचीचा ठेचा, भात, कांदा, लिंबू व गोड पदार्थ असा अस्सल गावरान महाप्रसाद भाविक आवडीने खातात. अन्नदान देण्यासाठी भाविकांना काही महिने प्रतीक्षा करावी लागते.
मात्र, गेल्या मार्चपासून कोरोनामुळे महाप्रसाद बंद करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला होता. आता तब्बल १० महिन्यांच्या खंडानंतर हा महाप्रसाद रविवारपासून पुन्हा सुरू करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे. कोरोना संसर्गापासून बचाव करण्यासाठी देवस्थान समितीने काही उपाययोजनांची अंमलबजावणी सुरू करूनच अन्नछत्रालय सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी भाविकांना सुरक्षित अंतर ठेवून जेवणासाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. जेवण वाढणाऱ्यांना मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले आहे. अन्नछत्रालयात सॅनिटायझरचा वापर करूनच भाविकांना प्रवेश देण्यात येणार आहे. कोरोना बाबत सर्व उपाययोजना करण्यात येणार असल्याने देवस्थान समितीने सांगिंतले.
....
कोरोनामुळे आगडगावचा महाप्रसाद दहा महिने बंद होता. आता सर्व नियम व उपाययोजनांचे पालन करून आम्ही महाप्रसाद पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. भाविकांनी यास सहकार्य करावे.
-बलभीम कराळे, अध्यक्ष, भैरवनाथ देवस्थान समिती, आगडगाव, ता. नगर.
..
फोटो-०२आगडगाव देवस्थान
०२आगडगाव भोजन
...
ओळी - नगर तालुक्यातील आगडगाव येथील श्री क्षेत्र भैरवनाथांचे पुरातन मंदिर तर दुसऱ्या छायाचित्रात येथील अन्नछत्रालयात भोजनाचा आस्वाद घेताना भाविक दिसत आहेत.