तळेगाव चौफुलीवर कडकडीत बंद : व्यवहार ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2018 16:36 IST2018-08-02T16:35:51+5:302018-08-02T16:36:06+5:30
सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सरपंच बाबासाहेब कांदळकर यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे बुधवारी बंद पुकारण्यात आला.

तळेगाव चौफुलीवर कडकडीत बंद : व्यवहार ठप्प
तळेगाव दिघे : सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सरपंच बाबासाहेब कांदळकर यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथे बुधवारी बंद पुकारण्यात आला. तळेगाव चौफुली परिसरात सर्व व्यवहार, दुकाने बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. सर्वधर्मीय बांधव बंदमध्ये सहभागी झाले. बंदच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुका पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
सरकारने मराठा आरक्षण देण्यास टाळाटाळ केल्याने सकल मराठा समाज संतप्त बनला आहे. या पार्श्वभूमीवर तळेगाव दिघे ग्रामपंचायतचे सरपंच बाबासाहेब कांदळकर यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी बंद पुकारला होता. या बंदमध्ये सर्वधर्मीय बांधव सहभागी झाले होते. सर्व व्यावसायिकांनी आपली दुकाने तसेच संपूर्ण व्यवहार बंद ठेवले. संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी पाळदे यांना मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीचे निवेदन देण्यात आले. मोठ्या पोलीस बंदोबस्तात बंद शांततेत पार पडला.