तहसीलदारांनी केली चालकास मारहाण ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2020 18:07 IST2020-04-11T18:06:16+5:302020-04-11T18:07:46+5:30
तहसीलदार ज्योती देवरे यांनी बांधकाम विभागात कार्यरत असलेले चालक आबा रावसाहेब औटी यांना मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली.

तहसीलदारांनी केली चालकास मारहाण ?
पारनेर : तहसीलदार ज्योती देवरे यांनी बांधकाम विभागात कार्यरत असलेले चालक आबा रावसाहेब औटी यांना मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. याबाबत आबा औटी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याबाबत तहसीलदार देवरे यांनी हा बनाव असल्याचे सांगितले.
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी शुक्रवारी सायंकाळी मला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली, अशी तक्रार औटी यांनी पारनेर पोलीस निरीक्षकांकडे केली आहे. आपणास तहसीलदारांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा औटी यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोन दिवसांपुर्वी जवळा येथील वृद्ध महिलेस मारहाण केल्याचा आरोप तहसीलदार देवरे यांच्यावर झाला होता. आता हा नवीन प्रकार समोर आल्याने तहसीलदार देवरे अडचणीत सापडल्या आहेत.
“बांधकाम कर्मचारी आबा औटी यांना मी मारहाण केली नाही. हा कोणाचा तरी बनाव आहे. मला कोरोना होईल असे तो सारखा म्हणू लागल्याने आम्ही त्यास वाहनावर थांबू नको, अशा सूचना दिल्या. आमच्याकडील वाहनावर तो असल्याने त्यास त्याचे घरमालक तेथे राहू देत नव्हते. त्यांना सुद्धा आम्ही समजून सांगितले होते,” असे तहसीलदार ज्योती देवरे यांनी सांगितले.