प्रशासक नियुक्तीस स्थगिती
By Admin | Updated: August 12, 2014 23:18 IST2014-08-12T22:55:25+5:302014-08-12T23:18:20+5:30
जामखेड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक मंडळ नियुक्त करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे.

प्रशासक नियुक्तीस स्थगिती
जामखेड : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक मंडळ नियुक्त करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असताना मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली आहे. सध्याची प्रक्रिया जैसे थे ठेवून लवकरात लवकर निवडणुका घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. खर्डा सेवा संस्थेचे उपाध्यक्ष शेख अन्सार रज्जाक यांनी याचिका दाखल केली होती.
जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीवर सध्या नियुक्त असलेल्या प्रशासकाच्या जागेवर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची वर्णी लागावी म्हणून काँग्रेसचे चार व राष्ट्रवादीचे तीन असे सात सदस्यीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात होती. याबाबत येथील सात कार्यकर्त्यांनी लागणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केली होती. दोन दिवसात प्रशासक मंडळाची घोषणा होईल अशी स्थिती होती. खर्डा येथील खर्डा विविध कार्यकारी सेवा संस्थेचे उपाध्यक्ष शेख अन्सार रज्जाक यांनी शासनाच्या प्रशासक मंडळ नियुक्त करण्याबाबतचे सहाय्यक निबंधक व बाजार समितीचे प्रशासक यांच्याकडून कागदपत्रे ८ आॅगस्ट रोजी मिळवून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यावर खंडपीठाचे न्यायमूर्ती आर. एम. बोरूडे, ए. आय. अचलिया यांच्यासमोर सुनावणी झाली. शेख यांच्या बाजूने अॅड. किशोर भोरे यांनी बाजू मांडली़ ३१ डिसेंबर पर्यंत निवडणुका घ्या, निवडणूक प्रक्रिया होईपर्यंत सध्याचे प्रशासक ठेवावे. सरकारी अधिकारी वगळता इतर कोणाची प्रशासक म्हणून नियुक्ती करू नये, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत़ (तालुका प्रतिनिधी)