शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे पुन्हा होणार सर्वेक्षण
By Admin | Updated: December 17, 2015 23:39 IST2015-12-17T23:29:13+5:302015-12-17T23:39:24+5:30
अहमदनगर : जानेवारी महिन्यात पुन्हा शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण होणार आहे. यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येणार आहे.

शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे पुन्हा होणार सर्वेक्षण
अहमदनगर : जानेवारी महिन्यात पुन्हा शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण होणार आहे. यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांची मदत घेण्यात येणार आहे. मंगळवारी जिल्हास्तरावर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यासह एकही विद्यार्थी शाळाबाह्य राहणार नाही, प्रत्येक शाळाबाह्याला शाळेत दाखल करण्याचे आदेश माध्यमिकचे शिक्षणाधिकारी लक्ष्मण पोले यांनी दिले.
जुलै २०१५ ला शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण झाल्यानंतर राज्य सरकारच्या शिक्षण विभागाकडे सर्वेक्षणात त्रुटी राहिल्या असल्याच्या तक्रारी स्वयंसेवी संस्थांकडून करण्यात आल्या होत्या. त्यामुळे शिक्षण विभागाने पुन्हा शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी प्रत्येक जिल्हा पातळीवर शाळाबाह्य विषयात काम करणारे व्यक्ती, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी, माध्यमिक शिक्षण विभागाने समिती स्थापन करून त्याव्दारे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार मंगळवारी शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या शोधमोहिमेसाठी बैठक झाली. यावेळी शिक्षणाधिकारी पोले, उपशिक्षणाधिकारी गुलाब सय्यद, शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी, स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी राजेंद्र काळे, तांबे उपस्थित होते. यावेळी सर्वप्रथम तालुकास्तरावरून गटशिक्षणाधिकारी यांच्या माध्यमातून ऊस तोडणीे, वीटभट्टी, खडी क्रशर कामगारांच्या वस्त्यांची माहिती संकलित करण्यात येणार आहे. त्यानंतर त्या ठिकाणी राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांच्या मदतीने सर्वेक्षण करण्यात येणार आहे. तसेच साखर कारखाने परिसरात कारखाना व्यवस्थापनाच्या मदतीने शाळाबाह्यांना त्याच ठिकाणी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)