शेवगाव तालुक्यातील कुपोषित बालकांचे होणार सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:19 IST2021-03-15T04:19:19+5:302021-03-15T04:19:19+5:30

शेवगाव : तालुक्यातील विविध ठिकाणच्या वाड्या, वस्त्यांवरील कुपोषित बालकांचे सर्वेक्षण करून तपासणी करण्याचे आदेश, राष्ट्रीय बाल विकास कार्यक्रम, विभागाचे ...

Survey of malnourished children in Shevgaon taluka | शेवगाव तालुक्यातील कुपोषित बालकांचे होणार सर्वेक्षण

शेवगाव तालुक्यातील कुपोषित बालकांचे होणार सर्वेक्षण

शेवगाव : तालुक्यातील विविध ठिकाणच्या वाड्या, वस्त्यांवरील कुपोषित बालकांचे सर्वेक्षण करून तपासणी करण्याचे आदेश, राष्ट्रीय बाल विकास कार्यक्रम, विभागाचे जिल्हा समन्वयक विजय दळवी यांनी दिले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार (दि.१५) पासून डोंबारी वस्तीसह तालुक्यातील विविध ठिकाणच्या वस्त्यांवर तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.

‘लोकमत’ने रविवारी ( दि.१४) रोजी कुपोषित मुलांच्या संदर्भात वृत्त प्रसिद्ध करुन संबंधित प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. दरम्यान शेवगावचे बालविकास प्रकल्प अधिकारी सोपान ढाकणे यांनी डोंबारी वस्तीला भेट देऊन त्या बालकांची अधिक माहिती घेतली. त्या कुपोषित बालकांसाठी इडीएनएफ अर्थात एनर्जी डेन्स न्युट्रीशियस फूड मागविण्यात आले असून ते दिले जाणार आहे. प्रमाणापेक्षा कमी वजन भरलेल्या मुलांना पोषण आहार देऊन त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे ढाकणे यांनी सांगितले.

शहरी असो वा ग्रामीण भागातील झिरो ते ६ वर्षे वयोगटातील सर्वच बालकांच्या दंड घेर, उंची व वजनाची माहिती घेतली जाणार आहे. यासाठी सेविकांमार्फत वैद्यकीय अधिकारी तपासणी करणार आहेत. त्यातून वयानुसार कुपोषणात मोडणाऱ्या बालकांना राहाता तालुक्यातील बाल विकास केंद्रात भरती करुन त्याच्या उपचार केले जातील, असे राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाचे समन्वयक दळवी यांनी सांगितले.

कुपोषित बालकांची प्रकल्प निहाय संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण आता सरसकट बालकांची तपासणी होणार आहे. त्यात दंडाचा घेर, वजन, उंची व वयाचे निकष काटेकोरपणे पाळले जाणार आहेत. या सर्व प्रकारामुळे तीव्र कुपोषित बालकांचीच खरी संख्या वाढण्याची शक्यता आहे. शिवाय यात अंगणवाडीच्या बाहेरील मुलांची ही तपासणी करायची असल्याने त्या मुलांची ही माहिती आता नव्याने उपलब्ध होणार आहे. अगोदर तालुक्यात १० तीव्र कुपोषित बालके होती. त्यात डोंबारी वस्तीत आढळलेल्या मुलांची भर पडल्याने एकूण १२ कुपोषित बालके झाल्याचे ढाकणे यांनी सांगितले.

----

डोंबारी वस्तीवरील त्या कुपोषित बालकांना शेवगाव ग्रामीण रूग्णालयात विविध तपासणीसाठी आणले जाणार आहे. त्यानंतर संबंधित विभागाला कळवून त्या मुलांवर पुढील औषधोपचार केले जातील.

-डॉ. रामेश्वर काटे,

वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रूग्णालय

---

१४ शेवगाव न्यूज

Web Title: Survey of malnourished children in Shevgaon taluka