टू-प्लस योजनेंतर्गत सराईत गुन्हेगारांवर पोलीस अधीक्षकांची सर्जिकल स्ट्राईक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:24 IST2021-07-14T04:24:09+5:302021-07-14T04:24:09+5:30
टू-प्लस योजनेतंर्गत मालमेत्तेबाबत, शरीराबाबत, वाळूसंदर्भात तसेच ज्यांच्यावर दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत, अशा गुन्हेगारांचा समावेश करण्यात आला आहे. ...

टू-प्लस योजनेंतर्गत सराईत गुन्हेगारांवर पोलीस अधीक्षकांची सर्जिकल स्ट्राईक
टू-प्लस योजनेतंर्गत मालमेत्तेबाबत, शरीराबाबत, वाळूसंदर्भात तसेच ज्यांच्यावर दोन पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत, अशा गुन्हेगारांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेतंर्गत गुन्हेगारांची माहिती संकलित करण्यासाठी जिल्ह्यात सर्व पोलीस स्टेशन स्तरावर व स्थानिक गुन्हे शाखा येथे प्रत्येकी एका पथकाची स्थापना करण्यात आली आहे. संकलित झालेल्या गुन्हेगारांची यादी क्रिमिनल माॅनेटरिंग इंटिलिजन्स सिस्टिम या ॲपवर भरण्यात आलेली असल्याचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले. या योजनेमुळे जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांची कुंडली आता पोलिसांच्या हातात आहे. पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, दीपाली काळे व सर्व उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अनिल कटके व योजनेतील अंमलदार यांनी ही कामगिरी केली आहे.
-----------------------
नव्याने तयार झाले हिस्ट्रीशीट, गुंडा रजिस्टर
टू-प्लस योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या प्रोफेशनल व सराईत गुन्हेगारांवर निगराणी ठेवण्यासाठी जिल्ह्यातील ४५१ सराईत गुन्हेगारांचे नवीन हिस्ट्रीशीट उघडण्यात आले आहे. तसेच नवीन ५१७ गुंडांना गुंडा रजिस्टरमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे.
--------------------
३८७ टोळ्या निष्पन्न
टू-प्लसमध्ये समाविष्ट असलेल्या १४२२ गुन्हेगारांवर आतापर्यंत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. विविध स्वरूपाचे संघटित गुन्हे करणाऱ्या एकूण ३८७ टोळ्या निष्पन्न करण्यात आल्या आहेत. सहा टोळ्यांविरोधात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली असून चार टोळ्यांना हद्दपार करण्यात आले आहे.
----------------------
आरोपी पोलिसांच्या नजरेखाली
टू-प्लसच्या सीएमआयएस ॲपमध्ये गुन्हेगाराचे नाव, पत्ता, त्याच्याविरोधातील गुन्हे, गुन्हे करण्याची पद्धत, त्याचे साथीदार आदींबाबत माहिती भरण्यात आली आहे. हे ॲप पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या मोबाइलमध्ये देण्यात आले आहे. तसेच सराईत गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष्य ठेवण्यासाठी त्यांच्या घरी जाऊन तपासणी केली जात आहे. त्यामुळे हे गुन्हेगार आता पोलिसांच्या नजरेखाली राहणार असून यातून गुन्हेगारी वाढत्या गुन्हेगारीला आळा बसणार असल्याचा विश्वास अधीक्षक पाटील यांनी व्यक्त केला आहे.
------------------
फोटो १२ पोलीस २
ओळी- टू-प्लस योजनेतंर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी गौरव केला.