कोरोनाच्या संभाव्य लाटेसाठी सुपा औद्योगिक वसाहत होतेय सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:16 IST2021-07-16T04:16:05+5:302021-07-16T04:16:05+5:30
सुपा : कोरोना आल्यावर त्याला थोपविण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी आताच संभाव्य लाटेला थोपविण्याचे नियोजन केले तर होणारे नुकसान टाळता ...

कोरोनाच्या संभाव्य लाटेसाठी सुपा औद्योगिक वसाहत होतेय सज्ज
सुपा : कोरोना आल्यावर त्याला थोपविण्यासाठी प्रयत्न करण्याऐवजी आताच संभाव्य लाटेला थोपविण्याचे नियोजन केले तर होणारे नुकसान टाळता येईल. त्या दृष्टीने पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसी कोरोनाची संभाव्य लाट थोपविण्यासाठी सज्ज होत आहे. उद्योगांच्या उत्पादनावर कोविडचा परिणाम होऊ नये, यासाठी नियोजन करण्यास शासकीय पातळीवर सुरुवात झाली आहे.
एमआयडीसीतील कारखान्यांच्या सीएसआर फंडातून कोविडसाठी होणारा खर्च हा अनुज्ञेय असून त्याद्वारे कारखान्यात काम करणारे कामगार, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी तपासणीकामी लागणारी लॅब कोविड केअर सेंटर व डीसीएचसी स्थापन करण्यात यावेत, अशी सूचना उपविभागीय अधिकारी सुधाकर भोसले यांनी केली.
सुपा एमआयडीसीतील उद्योग प्रतिनिधींच्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते. मायडिया ग्रुपचे व्यवस्थापक पंकज यादव यांनी स्वागत केले. यावेळी उद्योगाचे क्षेत्रनिहाय वर्गीकरण करून शक्य तेथे घरून काम करण्यासाठी कारखाना प्रशासनाने नियोजन करावे, बायोबबल कार्यपद्धतीचा वापराबाबत विचारविनिमय करावा, असेही यावेळी ठरले. एमआयडीसी परिसरात किंवा काही कंपनी परिसरात तात्पुरती निवास व्यवस्था करण्यात आली. कोरोनाचा संसर्ग टाळता येईल; परंतु याबाबत उद्योग प्रतिनिधींनी असमर्थता व्यक्त केली. कारखान्यातील गर्दी कमी करण्यासाठी कामाच्या वेळेची विभागणी करण्याबाबतचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. सध्या बऱ्याच कारखान्यात तसे नियोजन असून शिफ्ट पद्धतीत काम करून घेतले जात असल्याचे सांगण्यात आले. उद्योगातील कामगार, कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे १०० टक्के लसीकरण करून घेण्याबाबत भोसले यांनी आवाहन केले. खासगी डॉक्टरांकडून निर्धारित दरापेक्षा जास्त रक्कम मागितली जात असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी पी. जी. एलक्ट्रोप्लास्टचे प्रवीण निंबाळकर, ट्रॉपफ्रूट प्रॉडक्टचे राम गायकवाड, केएसपीजीचे अभिषेक कोळपेक, योगेश भोसले, इपिटॉमचे एस. एम. चव्हाण, तर स्विफ्ट टेक्नोप्लास्टचे प्रशांत माने, आम इंडियाचे प्रवीण भालेराव, लक्ष्मीकांत गांधी, शंकेश्वर फूड्सकडून विकास कलानी, प्रॉडक्शन मॅनेजर नीलेश ढगे, गौतम साबळे विविध उद्योगांचे उद्योग प्रतिनिधी उपस्थित होते.
----
ऑक्सिजन पुरवठ्याबाबत चाचपणी...
कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यात एमआयडीसीतील काही कारखान्यांनी भरीव मदत केल्याचे भोसले यांनी सांगितले. तिसऱ्या लाटेसाठी आवश्यक ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने काही नियोजन करता येईल का, याची चाचपणीही यावेळी करण्यात आली. कारखानदारांना सरकारी अधिकाऱ्याकडून कधी कधी त्रास दिला जात असल्याचा सूर बैठकीत व्यक्त झाला. याबाबतच्या तुमच्या भावना जिल्हाधिकाऱ्यांना कळविल्या जातील, असे त्यांनी सांगितले.