शेवगाव हत्याकांडातील आरोपीची कोठडीत आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 19:18 IST2017-08-23T18:56:28+5:302017-08-23T19:18:33+5:30
शेवगाव येथील हरवणे कुटुंबातील चौघांच्या हत्याकांड प्रकरणातील संशयित आरोपी अमोल संतोष उर्फ ईश्वर पिंपळे (वय २१) याने नेवासा पोलीस ठाण्यातील कोठडीत गळफास लावून आत्महत्या केली़

शेवगाव हत्याकांडातील आरोपीची कोठडीत आत्महत्या
अहमदनगर : शेवगाव येथील हरवणे कुटुंबातील चौघांच्या हत्याकांड प्रकरणातील संशयित आरोपी अमोल संतोष उर्फ ईश्वर पिंपळे (वय २१) याने नेवासा पोलीस ठाण्यातील कोठडीत गळफास लावून आत्महत्या केली़ मंगळवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली़ घटनेची माहिती समजताच जिल्हा पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा हे नेवासा येथे दाखल झाले़
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पिंपळे याला शेवगाव हत्याकांडप्रकरणी काही दिवसांपूर्वी श्रीरामपूर येथून अटक केली होती़ पिंपळे याच्यावर नेवासा पोलीस ठाण्यात विविध घटनेत तब्बल अकरा तर नांदगाव व पिंपळगाव (नाशिक) पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत़ विविध गुन्ह्यातील चौकशीसाठी पिंपळे याला नेवासा पोलिसांनी वर्ग करून घेतले होते़ न्यायालयाने त्याला २३ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली होती़ पिंपळे याने मात्र २२ आॅगस्टच्या मध्यरात्री कोठडी क्रमांक तीनमधील इतर कैदी झोपी गेल्यानंतर टॉवेलने गळफास लावून आत्महत्या केली़ याप्रकरणी नेवासा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे़ दरम्यान पिंपळे याच्या आत्महत्येनंतर त्याच्या आईने नेवासा पोलीस ठाणे परिसरात येऊन आक्रोश केला़
सीआयडी चौकशी
पिंपळे हा शेवगाव हत्याकांडासह अनेक गुन्ह्यातील संशयित आरोपी होता़ त्याच्या आत्महत्या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी सुरू झाली आहे़ सीआयडीचे नाशिक येथील पोलीस अधीक्षक रमेशकुमार गायकवाड यांनी नेवासा पोलीस ठाण्यात भेट देऊन घटनेची माहिती घेतली़ तसेच सीआयडीचे उपाधीक्षक कृष्णा यादव व हरिभाऊ जाधव यांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे़
पोलिसांवर निलंबनाची कारवाई ?
पिंपळे ज्या कोठडीत होता तेथे त्याच्यासह बारा कैदी होते़ इतर कैदी झोपल्यानंतर पिंपळे याने एकत्र दोन टॉवेल बांधून जाळीला दोर बांधून आत्महत्या केली़ यावेळी ड्यूटीला सुरक्षारक्षक कोण होता़ ठाणे अंमलदार आदींवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे़