दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांचा ठिय्या!
By Admin | Updated: June 10, 2014 00:12 IST2014-06-09T23:11:35+5:302014-06-10T00:12:24+5:30
अहमदनगर : तोंडावर आलेले शाळा प्रवेश व सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेसाठी लागणारे विविध दाखले देण्यास नगर तहसील कार्यालयातून विलंब होत असल्याच्या निषेधार्थ
दाखल्यांसाठी विद्यार्थ्यांचा ठिय्या!
अहमदनगर : तोंडावर आलेले शाळा प्रवेश व सध्या सुरू असलेल्या भरती प्रक्रियेसाठी लागणारे विविध दाखले देण्यास नगर तहसील कार्यालयातून विलंब होत असल्याच्या निषेधार्थ सोमवारी विद्यार्थ्यांनी व भरती उमेदवारांनी तहसीलदारांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. त्वरित दाखले उपलब्ध करून द्यावेत, संबंधित महा-ई-सेवा केंद्र चालकावर कारवाई करावी, अशा घोषणा देत आंदोलकांनी परिसर दणाणून सोडला.
नगर तहसील कार्यालया अंतर्गत विविध दाखल्यांसाठी महा-ई-सेवा केंद्र खासगी ठेकेदारामार्फत सुरू आहे. परंतु तेथील गलथान कारभारामुळे कोणतेही दाखले वेळेवर मिळत नाहीत. मुदतीत दाखले मिळत नसल्याने नागरिकांना हेलपाटे मारण्याची वेळ येते. सध्या महाविद्यालयीन प्रवेश सुरू असल्याने विद्यार्थ्यांना विविध दाखल्यांची गरज आहे. त्यासाठी त्यांनी दोन महिन्यांपूर्वीच दाखल्यांसाठी अर्ज दिले आहेत. परंतु अद्याप दाखले मिळाले नसल्याने विद्यार्थी धास्तावले आहेत.
फक्त विद्यार्थीच नाही तर इतर दाखल्यांसाठीही नागरिकांना चकरा मारल्याशिवाय काम होत नाही. शासकीय नियमानुसार ठरलेल्या वेळेत दाखले तयार होत नसल्याने केंद्रचालक मनमानी पद्धतीने पुढील तारीख देतात. परंतु त्या दिवशीही दाखले तयार नसतात. शिवाय दिलेली प्रकरणे गहाळ होण्याचे प्रकारही वाढले आहेत.
सध्या पोलीस भरती सुरू असून त्यासाठी लागणारे विविध दाखले अद्याप मिळाले नसल्याने उमेदवारांनी थेट तहसील कार्यालय गाठले. तेथील महा-ई-सेवा केंद्रावरील सगळा भोंगळ कारभार पाहिल्यानंतर त्यांनी थेट तहसील कार्यालयात ठिय्या देत दाखल्यांची मागणी केली.
दुपारपर्यंत दाखल्यांची व्यवस्था करावी, त्याशिवाय येथून उठणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतला. नायब तहसीलदार माधुरी आंधळे यांनी आंदोलकांची भेट घेऊन दाखले देण्याबाबत कार्यवाही सुरू केली. (प्रतिनिधी)
जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
येथील महा-ई-सेवा केंद्राबाबत आतापर्यंत अनेक तक्रारी आल्या असून, त्यावर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सोमवारी झालेल्या आंदोलनाबाबत आपणाला कल्पना नव्हती. परंतु येथे आल्यावर समजले. याबाबत संबंधित केंद्रचालक सुनील लांगोरे यांना बोलावून घेतले असून, दाखल्यांची व्यवस्था केली जाईल. तसेच या केंद्रावर कारवाई करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे अहवाल पाठवला आहे.
- कैलास पवार, तहसीलदार
अर्ज स्वीकारणे बंद
तहसील कार्यालयातील महा-ई-सेवा केंद्रात दाखल्यांसाठी अर्जांची संख्या वाढत असून, त्या प्रमाणात दाखले तयार होत नसल्याने आता नवीन अर्ज स्वीकारणे बंद केल्याचे समोर आले आहे. आहे तेवढेच अर्ज निकाली निघणार असून, नागरिकांना अन्य महा-ई-सेवा केंद्रांचा लाभ घ्यावा लागणार आहे.