येळपणेत पोलीस पथकावर दगडफेक
By Admin | Updated: August 21, 2014 23:05 IST2014-08-21T23:03:08+5:302014-08-21T23:05:56+5:30
श्रीगोंदा : बेलवंडी पोलीस पथकावर ३५ जणांच्या जमावाने दगडफेक करण्याची घटना बुधवारी (दि़२०) दुपारी घडली़ या दगडफेकीतून पोलीस बालंबाल बचावले

येळपणेत पोलीस पथकावर दगडफेक
श्रीगोंदा : तालुक्यातील येळपणे शिवारात रस्त्याचा वाद मिटविण्यासाठी गेलेल्या बेलवंडी पोलीस पथकावर ३५ जणांच्या जमावाने दगडफेक करण्याची घटना बुधवारी (दि़२०) दुपारी घडली़ या दगडफेकीतून पोलीस बालंबाल बचावले असून, याप्रकरणी आठ जणांना पोलिसांनी अटक केली़
याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, बंडू रामदास धावडे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन रस्त्याचा वाद मिटविण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक शिवाजी काटे यांच्यासह पाच-सहा पोलीस येळपणेतील गट क्र. २३९ मध्ये गेले होते. रस्ता करण्याचे आदेश प्रशासनाचे आहेत, त्यामुळे रस्ता करण्यास आडवे येऊ नका, असे पोलिसांनी संदीप खामकर यांना सांगितले़ मात्र, खामकर रस्ता करु देत नसल्यामुळे पोलिसांनी खामकरला बेलवंडी पोलीस ठाण्यात आणण्यासाठी गाडीत बसविण्याचा प्रयत्न केला़ त्यामुळे चिडलेल्या संदीप खामकरसह कमल खामकर, प्रमिला खामकर, राजेंद्र खामकर, बाळासाहेब खामकर, वसंत खामकर, बापू खामकर, रामराव खामकर इतर २५-३० जणांच्या जमावाने पोलीस पथकावर दगडफेक करुन शिवीगाळ केली़ यासंदर्भात सहाय्यक फौजदार भाऊसाहेब संतु साबळे यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
(प्रतिनिधी)