जिल्ह्यात आता १४ दिवसांसाठी कडक ‘जनता कर्फ्यू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:20 IST2021-04-18T04:20:51+5:302021-04-18T04:20:51+5:30

अहमदनगर : राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे लॉकडाऊन सुरूच आहे. मात्र, लोक ऐकत नसून कामाशिवाय रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे कोरोना ...

Strict 'public curfew' for 14 days | जिल्ह्यात आता १४ दिवसांसाठी कडक ‘जनता कर्फ्यू’

जिल्ह्यात आता १४ दिवसांसाठी कडक ‘जनता कर्फ्यू’

अहमदनगर : राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे लॉकडाऊन सुरूच आहे. मात्र, लोक ऐकत नसून कामाशिवाय रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे कोरोना आटोक्यात येण्याची शक्यता नाही. येथून पुढे १४ दिवस कडक लॉकडाऊन लागू करण्यात येईल. अर्थात तो जनता कर्फ्यू असेल. या काळात अत्यावश्यक सेवाही बंद राहतील. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. जनता कर्फ्यूबाबत जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले हे सुधारित आदेश काढतील, असेही पालकमंत्र्यांनी जाहीर केले.

जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतर शनिवारी दुपारी पालकमंत्री मुश्रीफ यांनी नियोजन भवनात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार रोहित पवार, आमदार लहू कानडे, आमदार निलेश लंके, आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांच्यासह यंत्रणेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जिल्ह्यातील तोकडी आरोग्य यंत्रणा, ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शनची कमतरता, त्यामुळे रुग्णांचे सुरू असलेले हाल, प्रशासकीय यंत्रणेचा गाफीलपणा आदींबाबत पत्रकारांनी मुश्रीफ यांना धारेवर धरले. त्यानंतर मुश्रीफ यांनी सध्या सुरू असलेला जनता कर्फ्यू अधिक कडक करण्याची घोषणा केली. ते म्हणाले, जनता कर्फ्यूमध्ये नागरिकांनीच सहकार्य करायचे आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी लॉकडाऊन हा एकमेव पर्याय आहे. जनता कर्फ्यू असल्याने नागरिकांनीच स्वयंशिस्त पाळायची आहे. या काळात अत्यावश्यक सेवाही बंद राहतील. तज्ज्ञांच्या मते कोरोनाची तीव्रता कमी होण्यासाठी १४ दिवसांचा कालावधी लागतो. या काळात एकमेकांचा संपर्क कमी झाला तर रुग्णांची संख्या निश्चित कमी होईल. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने सर्व तयारी केली होती. आजही ऑक्सिजन बेड, व्हेंटीलेटर शिल्लक आहेत. मात्र, निर्मिती क्षमतेला मर्यादा असल्याने ऑक्सिजनचा तुटवडा होत आहे. याबाबत जिल्ह्याला पुरेसा ऑक्सिजनचा पुरवठा कसा होईल याबाबत राज्यस्तरावर नियोजन करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

------

असा वाढला कोरोना..............

१० दिवसांतील रुग्ण- २३६४१

फेब्रुवारी-२०२१-३६४५

मार्च-२०२१-१९०४१

एप्रिल-२०२१-३४३३५

आतापर्यंतच्या चाचण्या-५,७६,८१९

पाॅझिटिव्ह होण्याचे प्रमाण-२२ टक्के

बरे होण्याचे प्रमाण-२२.४१ टक्के

-------

असे झाले मृत्यू...............

फेब्रुवारी-२०२१- ४८

मार्च-२०२१-१२२

एप्रिल-२०२१-१७०

एकूण मृत्यू-१४४१

मृत्यू होण्याचे प्रमाण-१.११ टक्के

-----------

गावांनी खबरदारी घ्यावी

आपल्या गावात येणाऱ्या प्रत्येकाने कोरोनाला अडविण्याचे ठरविले तर गावात कोरोनाचा शिरकाव होणार नाही. गावात येणाऱ्या प्रत्येकाची चाचणी करून त्याला १० दिवस प्राथमिक शाळेत विलगीकरणात ठेवणे गरजेचे आहे. ही खबरदारी गावपातळीवर घेतली तर कोरोना लवकरच संपुष्टात येईल. कोरोनाला अटकाव करण्याची जबाबदारी ग्रामसमिती आणि प्रभाग समितीने घेतली तर त्यांचे कामही सिद्ध होईल, असे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.

-------------

अपूर्ण

Web Title: Strict 'public curfew' for 14 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.