नगरमध्ये १ जूनपर्यंत कडक लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:19 IST2021-05-17T04:19:25+5:302021-05-17T04:19:25+5:30
अहमदनगर : नगर शहरात लागू करण्यात आलेले कठोर निर्बंध शनिवारी शिथिल करण्यात आले होते. मात्र, गर्दीने उच्चांक गाठल्याने महापालिका ...

नगरमध्ये १ जूनपर्यंत कडक लॉकडाऊन
अहमदनगर : नगर शहरात लागू करण्यात आलेले कठोर निर्बंध शनिवारी शिथिल करण्यात आले होते. मात्र, गर्दीने उच्चांक गाठल्याने महापालिका आयुक्तांनी कडक निर्बंध लागू केले असून, येत्या १ जूनपर्यंत नगरमध्ये कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. तसा आदेश मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी रविवारी सायंकाळी जारी केला.
नगर शहरातील कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने महापालिकेने शनिवारी सकाळपासून भाजीपाला, किराणा मालाची खरेदी विक्री करण्याची मुभा दिली होती. सकाळी ७ ते ११ या वेळेत विक्रीस परवानगी दिली गेली. मात्र, गेल्या दोन दिवसांत शहर व परिसरात नागरिकांनी एकच गर्दी केली होती. भाजीपाला खरेदीसाठी नागरिक रस्त्यावर उतरले होते. किराणा व चिकन शॉपसमोर रविवारी रांगा लागल्या होत्या. शहरासह उपनगरातील रस्त्यांवर वाहनांची पूर्वीप्रमाणे गर्दी पाहायला मिळाली. महापालिकेचे दक्षता पथक व पोलिसांनी तसा अहवाल दिला. ही गर्दी अशीच कायम राहिल्यास कोरोनाची कमी झालेली संख्या पुन्हा वाढू शकते. रविवारी नगरमध्ये १७४ नवे रुग्ण आढळून आले. नगरधील रुग्ण संख्येत घट होत असली तरी खरेदीसाठी गर्दी सर्वांच्या चिंतेचा विषय बनला होता. त्यामुळे महापालिकेने पुन्हा कडक निर्बंध लागू केले असून, हा आदेश येत्या १ जूनपर्यंत लागू राहणार आहे. कठोर निर्बंधांची शहरात कडक अंमलबजावणी करण्यासाठी दक्षता पथकांची संख्याही वाढविण्यात येणार असून, नियमांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
....
...हे राहणार बंद
- किराणामालाची खरेदी विक्री पूर्णपणे बंद
-भाजीपाला फळांची खरेदी विक्री बंद राहील
- सर्व खासगी आस्थापना पूर्णपणे बंद राहतील
-अंडी मटन, चिकन, मत्स्य विक्री करणारी दुकाने
शेतीशी निगडीत मशिनरी, पंप इत्यादी दुकाने बंद राहतील
......
हे सुरू राहील
वैद्यकीय सेवा औषधी दुकाने सुरू राहतील
-अत्यावश्यक सेवेसाठी पेट्रोल पंप नियमित वेळेत सुरू राहतील.
-सर्व बँका सुरू राहतील.
-दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री सकाळी ७ ते ११ या वेळेत.
- बी-बियाणे खते कीटकनाशकांची दुकाने ७ ते ११ या वेळेत सुरू राहतील.
....
नगर शहरातील कठोर निर्बंध शनिवारी काही प्रमाणात शिथिल करण्यात आले होते. प्रायोगिक तत्त्वावर सकाळी ७ ते ११ या वेळेत भाजीपाला, किराणा विक्री करण्यास परवानगी दिली होती. परंतु, कमालीची गर्दी झाली. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती असून, पुन्हा कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे.
- शंकर गोरे, आयुक्त महापालिका
..
५ लाख २० हजारांचा दंड वसूल
महापालिकेच्या दक्षता पथकाने गेल्या दोन महिन्यांत नियमन पाळणऱ्या ४८९ जणांवर कारवाई केली असून, त्यांच्याकडून ५ लाख ३० हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.