कामचुकारपणा केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2021 04:22 IST2021-04-27T04:22:01+5:302021-04-27T04:22:01+5:30
संगमनेर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, तो रोखण्याकरिता संपूर्ण तालुक्यातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. आपल्याला माणसं जगविण्यासाठी ...

कामचुकारपणा केल्यास संबंधितांवर कठोर कारवाई
संगमनेर : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, तो रोखण्याकरिता संपूर्ण तालुक्यातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. आपल्याला माणसं जगविण्यासाठी मिशन मोडवर काम करायचे आहे. त्यामुळे प्रत्येकाने त्याच्यावर सोपविलेली जबाबदारी कर्तव्य भावनेतून पार पाडावी. कामचुकारपणामुळे कुणाचा जीव जायला नको. असे झाल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराच संगमनेरचे तहसीलदार अमोल निकम यांनी दिला.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सोमवारी (दि. २६) येथील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनात संगमनेर तालुक्यातील १४३ ग्रामपंचायतींचे सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील यांची बैठक बोलावण्यात आली होती. चार टप्प्यात झालेल्या बैठकीत तहसीलदार निकम यांनी प्रत्येकाला सूचना देत, काही कामचुकारांना खडेबोल सुनावले. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यावेळी उपस्थित होते.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता तालुक्यात प्रत्येक गावात कोरोना ग्रामसुरक्षा समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीतील सदस्यांनी गावपातळीवर ग्रामस्थांच्या आरोग्य तपासणीच्या मोहिमेत चांगले काम करणे अपेक्षित आहे. कोरोनाची व इतर आजारांची लक्षणे जाणवत असलेल्या नागरिकांची कोरोना टेस्ट करून घ्यावी. ज्यांची तपासणी झाली असेल, अशा नागरिकांचे संस्थात्मक विलगीकरण करावे. सर्वांना नियम सारखेच असून, कुठलाही दुजाभाव करू नये. कोरोनाचा रुग्ण आढळून आलेल्या ठिकाणी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करावीच लागणार आहे. अतिसंवेदनशील परिसरात बारकाईने लक्ष ठेवून नवीन नियमावलींनुसार अंमलबजावणीसंदर्भात कठोर पावले उचलावीत. बाहेरून येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवावे, असे झाल्यास तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल, असेही तहसीलदार निकम म्हणाले.
------
डॉक्टर, मेडिकलवर होणार कारवाई
कोरोना व कोरोनासदृश इतर आजारांची लक्षणे आढळून येणाऱ्या ग्रामस्थांची कोरोना तपासणी करणे बंधनकारक आहे. असे रुग्ण गावांतील डॉक्टरांकडे जातात. अनेकदा मेडिकलमध्ये तात्पुरत्या स्वरूपात औषधे, गोळ्या ते घेतात. डॉक्टरही त्यांच्या घरी जाऊन त्यांना सलाईन देत औषधोपचार करतात, असे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कोरोनाची लागण झालेल्यांना योग्य व वेळेत उपचार न मिळाल्याने ते गंभीर होतात. त्यामुळे डॉक्टर, मेडिकल दुकानदारांनीदेखील सहकार्य करावे; अन्यथा त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचे तहसीलदार निकम यांनी सांगितले.