वा..! याला म्हणतात भूतदया; बस थांबवली, पक्ष्याला वाचवले
By शेखर पानसरे | Updated: October 1, 2023 14:58 IST2023-10-01T14:56:05+5:302023-10-01T14:58:01+5:30
मांजात अडकलेल्या पक्ष्याला बसवर चढून दोर टाकून जीवदान

वा..! याला म्हणतात भूतदया; बस थांबवली, पक्ष्याला वाचवले
संगमनेर : ( अहमदनगर) संगमनेर बसस्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर मोठा पिंपळ वृक्ष आहे. या पिंपळ वृक्षाला चायनीज मांजा अडकला होता, त्या मांजात पंख अडकलेल्या साळुंकी पक्ष्याला तरुणांनी जीवदान दिले. झाडाला फार उंचावर पक्षी अडकला होता, तिथपर्यंत दोर जात नव्हता. त्यामुळे बस थांबवून तिच्या टपावर चढून दोर टाकून पक्ष्याला वाचविण्यात यश आले.
शनिवारी (दि. ३०) संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास पिंपळ वृक्षाला अडकलेल्या चायनीज मांजात साळुंकी पक्ष्याचे पंख अडकल्याचे काही नागरिकांच्या लक्षात आले. हा पक्षी मांजातून स्वताला सोडविण्याचा प्रयत्न करत होता. परंतु पक्ष्याच्या पंखाला मांजाचा विळखा पडल्याने त्याला त्यांची सुटका करून घेता येत नव्हती. त्यावेळी दत्तात्रय भुजबळ, मल्हार भुजबळ, मनोज भोपे, अभिजीत लहामगे यांसह ओंकार थोरात, गणेश ठोंबरे, पंकज वाघ, आशिष कोऱ्हाळकर यांनी पक्षाला वाचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
पक्षी झाडाला उंचावर अडकल्याने त्याला काढणे अवघड काम होते. त्याचवेळी एका दुचाकीला बांधलेला मोठा दोर काढून तो मांजावर टाकून पक्षाला वाचविण्याचा प्रयत्न सुरू होता. मात्र, दोर तिथपर्यंत जात नसल्याने बसस्थानकातून बाहेर पडणाऱ्या बसला थांबविण्यात आले. ओंकार थोरात हा बसच्या टपावर चढला, त्याने मांजावर दोर फेकून पक्षाला अलगद खाली काढले. पक्ष्याचे पंख मांजात अडकून तो जखमी झाल्याने त्याला उडता येत नव्हते. त्यामुळे हेल्पिंग हँण्डस् युथ ऑर्गनायझेशन या प्राणी, पक्षी, भटकी जनावरे, सर्प यांच्यासाठी कार्य करणारे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भूषण नरवडे यांना याबाबत कळविण्यात आले. नरवडे यांनी तातडीने येऊन पक्षाला ताब्यात घेतले, पुढील उपचारांसाठी ते त्याला घेऊन गेले आहेत.