नफा वाटणीच्या वादातून नळ योजनेचे काम बंद
By Admin | Updated: July 23, 2014 00:15 IST2014-07-22T23:07:13+5:302014-07-23T00:15:04+5:30
श्रीगोंदा : तालुक्यातील टाकळीकडेवळीत येथील ७६ लाखाच्या नळपाणी पुरवठा योजनेचे काम नफा वाटणीच्या वादातून बंद पडले आहे. ४५ लाखांचा निधी खर्चुनही नळाला पाणी येत नाही.
नफा वाटणीच्या वादातून नळ योजनेचे काम बंद
श्रीगोंदा : तालुक्यातील टाकळीकडेवळीत येथील ७६ लाखाच्या नळपाणी पुरवठा योजनेचे काम नफा वाटणीच्या वादातून बंद पडले आहे. ४५ लाखांचा निधी खर्चुनही नळाला पाणी येत नाही. त्यामुळे टाकळीकडेवळीत येथे सध्या पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले आहे.
&^&^ ७६ लाख मंजूर
भारत निर्माण जल योजनेतून टाकळीकडेवळीतसाठी देवीच्या माळावर विहीर खोदून टाकळी गावासाठी सुधारित योजना करण्यासाठी सहा वर्षांपूर्वी ७६ लाख मंजूर करण्यात आले. या योजनेच्या कामात होणारा नफा गावाच्या विकास कामांसाठी वापरण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला होता.
योजनेवर २६ लाख खर्च
सतीश नवले यांच्या सरपंचपदाच्या कारकिर्दीत पाणी पुरवठा योजनेवर २६ लाख खर्च झाला. माझ्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत सुमारे १९ लाखांची कामे केली. त्यापैकी ११ लाखांची बिले काढण्यात आली आहेत, असे विद्यमान सरपंच दैवता वाळुंज यांनी सांगितले.
टाकळीकडेवळीतमध्ये वादंग
पाणीपुरवठा योजनेतील कामात झालेला नफा वाटणीवरुन टाकळीकडेवळीत येथे सध्या चांगलेच वादंग निर्माण झाले आहे. ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन सरपंचांना याबाबत जाबही विचारला. या वादामुळे पाणीपुरवठा योजनेचा ३१ लाखांचा निधी ग्रामपंचायतीकडे पडून आहे. या वादामुळे विहीर खोदाईचे काम अपूर्ण आहे.
भूजल पातळी खालावली
भूजल पातळी खोलवर गेल्याने विहीर कोरडी पडली आहे. परिणामी ग्रामस्थांना भीषण पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण भटकंती करावी लागत आहे.
(तालुका प्रतिनिधी)
वेठीस धरले
नळ योजनेचे काम आतापर्यंत पुर्णही झाले असते. परंतु काही मंडळींनी वेठीस धरले. कामाचा केव्हाही हिशोब देण्याची तयारी आहे.
- दैवता वाळुंज,
सरपंच, टाकळीकडेवळीत
हिशोब मांडणार
नफा वाटणीवरुन निर्माण झालेल्या वादामुळे ग्रामस्थांनी ग्रामसभा बोलवावी. आपल्या काळात झालेले काम, झालेला नफा ग्रामसभेत सादर करण्याची तयारी आहे.
- सतीश नवले,
माजी सरपंच, टाकळीकडेवळीत