पाटचारी आवर्तनासाठी रास्ता रोको

By Admin | Updated: August 19, 2014 23:31 IST2014-08-19T23:17:35+5:302014-08-19T23:31:30+5:30

नगर-पैठण राज्य मार्गावरील पाडळी पुलावर मंगळवारी भाजपा युवा मोर्चाच्यावतीने तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

Stop the way for Patkar's rotation | पाटचारी आवर्तनासाठी रास्ता रोको

पाटचारी आवर्तनासाठी रास्ता रोको

तिसगाव : मुळा पाटचारी लाभक्षेत्रातील पाडळी, चितळी, सुसरे, साकेगाव भागाला आवर्तन सोडून पिण्याचे पाणी व चाऱ्याचा प्रश्न सोडवावा, या प्रमुख मागणीसाठी नगर-पैठण राज्य मार्गावरील पाडळी पुलावर मंगळवारी भाजपा युवा मोर्चाच्यावतीने तासभर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे, संदीप राजळे, बाजीराव गर्जे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. पाटपाणी आवर्तनाने परिसराचे जलस्त्रोत बळकट होतात, विहिरींना नैसर्गिकरित्या याचा फायदा होतो. वाढती चारा व पाणी टंचाई यावर आवर्तन हा दुहेरी पर्याय आहे, असे आंदोलनकर्त्यांनी सांगत मागणी लावून धरली.
तहसीलदार सुभाष भाटे, पाटबंधारे अधिकारी वृध्देश्वर कारखान्यावर गेल्यानंतर तेथे समन्वय बैठकीनंतर ते पाडळीला आले. पाणी आवर्तनाची निश्चित तारीख, वेळ पाटबंधारे अधिकारी देत नसल्याने रास्ता रोको लांबला. येत्या २५ आॅगस्टपर्यंत आवर्तन सुटेल, असे आश्वासन उपअभियंता एस.टी. देशमुख, शिवाजी भगत यांनी दिल्यानंतर रास्ता रोको स्थगित करण्यात आला. आश्वासनाप्रमाणे आवर्तन न आल्यास पुन्हा याच ठिकाणी रस्त्यावर येऊ, असा इशारा पाथर्डीचे माजी नगराध्यक्ष दिनकर पालवे यांनी दिला.
वीजप्रश्नी दोन तास रास्ता रोको
बोधेगाव : वीज पुरवठा जोडलेला नसतांनाही आकारलेले बिल कमी करून जळालेले जनित्र तातडीने दुरुस्त करावे, या मागणीसाठी शेवगाव तालुक्यातील लखमापुरी ग्रामस्थांनी मंगळवारी शेवगाव-गेवराई राज्य मार्गावरील कांबी फाटा येथे रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलन दोन तास चालले. लखमापुरी येथील गावठाणमधील जनित्र अनेक वर्षापासून बंद असूनही ‘महावितरण’ कडून वीज बिलाची आकारणी केली जाते, अशा शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. जनित्र बंद असल्याने बिल कमी करावे, जळालेले जनित्र तातडीने सुरु करून सुरळीत वीज पुरवठा करावा, या मागण्यांसाठी कांबी फाटा येथे रास्ता रोको करण्यात आले. ‘महावितरण’ चे उप अभियंता सतीश शिंपी यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली असता त्यांना घेराव घालण्यात आला. त्यानंतर आंदोलनकर्त्यांशी चर्चा करुन हा प्रश्न तातडीने मार्र्गी लावण्याचे आश्वासन दिले, त्यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनामुळे राज्य मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. आंदोलनात अशोक कवडे, बंडू कुराळे, पांडुरंग गवते, दत्तात्रय तिळे, एकनाथ गावंडे, भाऊराव निर्मळ, भास्कर गावंडे, आशाबाई पवार तसेच शेतकरी सहभागी झाले होते.
वीज, पाटपाणीप्रश्नी रास्ता रोको
तिसगाव : मुळा उजवा कालव्याला आवर्तन सोडावे, शेतात लोंबकळलेल्या तारा व वाकलेल्या वीज खांबाची दुरुस्ती करुन वीज पुरवठा सुरळीत करावा, या प्रमुख मागण्यांसाठी श्री क्षेत्र हनुमान टाकळी ग्रामस्थांच्यावतीने मंगळवारी नगर-पैठण राज्यमार्गावर वृध्देश्वर साखर कारखाना येथे अर्धा तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सरपंच कुशीनाथ बर्डे, अ‍ॅड. रावसाहेब बर्डे यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. ढोल, ताशांच्या गजरात मागण्या मांडत आंदोलनकर्त्यांनी परिसर दणाणून सोडला. श्री क्षेत्र हनुमान टाकळी गाव एकेकाळी पाथर्डी तालुक्याला टँकरने पाणी पुरवठा करीत होते. तेथे सध्या पाऊस लांबल्याने पाणी टंचाई आहे. पाटपाणी आल्यास जनावरांसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल, टँकरची गरज पडणार नाही, अशी आंदोलकांची प्रमुख मागणी होती. लोंबकळलेल्या वीज तारा व वाकलेल्या खांबांनी वीज अपघात होतात. तारा व खांबाच्या दुरुस्तीसाठी तीन वर्षापासून ग्रामसभा होऊन ठरावही झाला. हा ठराव ‘महावितरण’ ला देण्यात आला. तरीही दुरुस्ती होत नाही, उलट दुरुस्तीसाठी पैशाची मागणी होते, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी ‘महावितरण’ च्या अधिकाऱ्यांवर केला. पाणी आवर्तनाबाबत तीन दिवसात कार्यवाही करू, असे आश्वासन उपअभियंता एस.टी.देशमुख यांनी दिले तर ‘महावितरण’ च्यावतीने तारा व खांबांच्या दुरुस्तीचा प्रस्ताव करण्याचे मान्य केले. त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले. पाथर्डीचे तहसीलदार सुभाष भाटे यांनी समन्वयाची चर्चा घडवली. त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

Web Title: Stop the way for Patkar's rotation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.