पारनेर : सत्ता व पैशाच्या जोरावर राष्ट्रवादी व काँग्रेसने गैरप्रकारातून राज्याची वाट लावली. अशा मंडळींना सत्तेतून दूर करून राज्य काँग्रेसमुक्त करा, असे प्रतिपादन भाजपाच्या युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आ. पंकजा मुंडे यांनी केले. पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार बाबासाहेब तांबे यांच्या प्रचार सभेत आ. मुंडे बोलत होत्या. आ. मुंडे म्हणाल्या, माझी लढाई राष्ट्रवादीच्या थातूर-मातूर नेत्यांशी नाही. तर माझ्यासह सामान्य जनतेची सावली असणारे गोपीनाथ मुंडे यांना आपल्यातून खेचून नेणाऱ्या नियतीशी आहे. त्यामुळे आपण राज्यभरात फिरून भाजपाचाच मुख्यमंत्री होऊन सत्ता आणण्यासाठी प्रचार करीत आहे. भाजपाचे नेते व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकासाचा नारा दिला असून राज्यातही भाजपाची सत्ता आल्यावर पारनेर तालुक्याचा चेहरा-मोहरा बदलून टाकणार असल्याचे त्यांनी सांगितले. खासदार दिलीप गांधी म्हणाले की, स्व. गोपीनाथ मुंडे यांचे विकासात्मक महाराष्ट्राचे स्वप्न साकारण्यासाठी भाजपाला सत्ता द्या, असे त्या म्हणाल्या. .... तर पारनेर घेणारमाझे वडील गोपीनाथ मुंडे यांनी बंद पडलेला पारनेर साखर कारखाना भाडेतत्वावर घेऊन सहा वर्षे चालविला. पारनेरला भाजपाचा आमदार करा मग मी पारनेर साखर कारखाना चालविण्यास घेईल, असे त्यांनी सांगितले. वृक्षांची सावली अन् पंकजातार्इंचे अश्रूपारनेर बाजारतळावर वटवृक्षाची मोठी सावली आहे. या सावलीने कुणालाही ऊन जाणवले नाही. पंकजातार्इंनी भाषणाच्या सुरूवातीलाच राज्यात मी चार हजार किलोमीटर फिरले. दोनशे-तीनशे सभा घेतल्या पण अशी जाहीर सभा वृक्षांच्या सावलीत पाहिली नाही, असे सांगितले. पण त्या वृक्षांना जपवणूक करा नाही तर झाड गेल्यावर सावली मिळायला चाळीस वर्षे वाट पहावी लागते, असे म्हणून आपले वडील गोपीनाथ मुंडेंची आपल्यावरील सावली गेल्याची आठवण झाली अन् त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.
राज्य काँग्रेसमुक्त करा
By admin | Updated: October 9, 2014 00:11 IST