मेहेकरी येथे कोविड सेंटर सुरु करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:19 IST2021-04-15T04:19:13+5:302021-04-15T04:19:13+5:30
केडगाव : नगर तालुक्यातील मेहेकरी फाटा परिसरामध्ये १५ ते २० गावे आहेत. या गावांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. येथे ...

मेहेकरी येथे कोविड सेंटर सुरु करा
केडगाव : नगर तालुक्यातील मेहेकरी फाटा परिसरामध्ये १५ ते २० गावे आहेत. या गावांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. येथे कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने या परिसरात कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी मेहेकरीचे सरपंच सुधीर पोटे यांनी केली आहे.
मेहेकरी येथे कोविड सेंटर नसल्याने या परिसरातील गोरगरीब जनतेचे हाल होत आहेत. नगर तालुक्यात ४ ठिकाणी कोविड सेंटर सुरु केली आहेत. परंतु, मेहेकरी फाटा परिसरात असे सेंटर सुरु केलेले नाही. त्यामुळे लवकरात लवकर येथे कोविड सेंटर सुरु करावे अन्यथा आम्हाला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा देण्यात आला आहे. एकट्या मेहेकरीमध्ये २५ रूग्ण आहेत तर परिसरातील इतर गावांमध्येही रुग्णसंख्या वाढत आहे.
मेहेकरी फाटा परिसरात दहा-बारा गावे असून, या सर्व गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढल्याने या परिसरातील रुग्णांना नगरमध्ये किंवा इतर ठिकाणी जावे लागते. अशातच बेड शिल्लक नसल्याने या रुग्णांची हेळसांड होते. पुढील काळात जर रुग्ण वाढले तर एक उपाययोजना म्हणून मराठा विद्याप्रसारक मंडळाचे सदगुरू विद्यालय येथे शासनाने कोविड सेंटर सुरू करावे, अशी मागणी मेहेकरी फाटा परिसरातून होत आहे.
या परिसरामध्ये मेहेकरी, बारादरी, रतडगाव, रांजणी, माथनी, कौडगाव, बालेवाडी, जांब, पारगाव, पारेवडी, सोनवडी, पिंपळगाव, शहापूर, केकती अशी मोठी गावे आहेत.