साईनगरीतील गुरूपौर्णिमा उत्सवास प्रारंभ
By Admin | Updated: July 12, 2014 01:11 IST2014-07-11T23:31:31+5:302014-07-12T01:11:20+5:30
शिर्डी : साईबाबा व जगभरातील करोडो साईभक्तांतील गुरू-शिष्यांचे, माय-लेकरांचे नाते दृढ करणाऱ्या शिर्डीतील एकशे सहाव्या गुरूपौर्णिमा उत्सवाला पारंपरिक पद्धतीने श्रीगणेशा झाला़
साईनगरीतील गुरूपौर्णिमा उत्सवास प्रारंभ
शिर्डी : साईबाबा व जगभरातील करोडो साईभक्तांतील गुरू-शिष्यांचे, माय-लेकरांचे नाते दृढ करणाऱ्या शिर्डीतील एकशे सहाव्या गुरूपौर्णिमा उत्सवाला पारंपरिक पद्धतीने श्रीगणेशा झाला़ या निमित्त देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांनी साईनगरी उल्हासित झाली आहे़
शुक्रवारी पहाटे काकड आरतीनंतर साईप्रतिमा व साईसच्चरित्र ग्रंथाच्या मिरवणुकीने उत्सवाचा प्रारंभ झाला़ या मिरवणुकीत कार्यकारी अधिकारी कुंदन सोनवणे यांनी ग्रंथ, उपकार्यकारी अधिकारी अप्पासाहेब शिंदे व मंदिर प्रमुख रामराव शेळके यांनी साईप्रतिमा, तर पुरोहित दिगंबर कुलकर्णी यांनी विणा धरुन सहभाग घेतला़ समाधी मंदिरापासून निघालेली ही मिरवणूक गुरूस्थान मार्गे समाधीच्या उत्तर द्वारात आल्यानंतर पाच सुवासिनींनी फोटो, ग्रंथ व विणा धारकांचे पाय धुऊन त्यांचे औक्षण केले़ नंतर ही मिरवणूक द्वारकामाई मंदिरात आल्यानंतर साईसच्चरित्राचे पूजन करुन अखंड पारायणाला सुरूवात करण्यात आली़
सकाळी कुंदन सोनवणे यांनी सपत्नीक साईसमाधीची पाद्यपूजा केली़ दुपारी कीर्तनाचा कार्यक्रम झाला, तर रात्री गावातून साईप्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली़
या उत्सवात सहभागी होण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून तसेच परिसरातून पालख्या घेऊन आलेल्या पदयात्रींनी साईनगरी गजबजून गेली आहे़ या उत्सवाच्या निमित्ताने साईभक्तांची संभाव्य गर्दी व पावसाची शक्यता गृहित धरून विविध ठिकाणी ७५ हजार चौरस फुटांचे ताडपत्रीचे मंडप टाकण्यात आले आहेत़ पालख्यामधून आलेल्या पदयात्रींची साईआश्रम दोन या इमारतीत विनामूल्य निवास व्यवस्था करण्यात आली आहे़ या काळात साईभक्तांना पुरेसा लाडू प्रसाद उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने २७५ क्विंटल साखरेचे बुंदी लाडू तयार करण्यात आले आहेत़
या तीनही दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे़ दासगणू परंपरेतील ह़भ़प़ माधवराव आजेगावकर या उत्सव काळात कीर्तन व भजनाची सेवा देणार आहेत़ यंदाही बंगलोर येथील साईभक्त सुब्रामणी राजू व प्रसाद बाबू यांच्या देणगीतून मंदिर व परिसरात फुलांची सजावट करण्यात येत आहे़ तर मुंबईच्या साईराज डेकोरेटर्सच्या वतीने करण्यात येणाऱ्या विद्युत रोषणाईने मंदिर परिसर उजळून निघाला आहे़
या उत्सव काळात तीनही दिवस भाविकांच्या देणगीतून संस्थानच्या प्रसादालयात मोफत मिष्टान्न भोजन देण्यात येत आहे़ संस्थानच्या त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष व जिल्हा प्रधान न्यायाधीश शशिकांत कुलकर्णी, जिल्हाधिकारी अनिल कवडे, कार्यकारी अधिकारी कुंदन सोनवणे, तसेच उपकार्यकारी अधिकारी आप्पासाहेब सोनवणे या उत्सवात भाविकांचे दर्शन व वास्तव्य सुखद व्हावे याकडे लक्ष देत आहेत़ यंदा या उत्सवावर पाणी टंचाईचे सावट आहे़(तालुका प्रतिनिधी)