दीपोत्सवाला प्रारंभ
By Admin | Updated: October 21, 2014 00:59 IST2014-10-21T00:43:32+5:302014-10-21T00:59:42+5:30
अहमदनगर : ‘दिन दिन दिवाळी... गाई म्हशी ओवाळी’अशा आनंद आणि प्रकाशाच्या उत्सवाला सोमवारी प्रारंभ झाला. गोरज मुहूर्तावर गाय-वासराचे पूजन करून

दीपोत्सवाला प्रारंभ
अहमदनगर : ‘दिन दिन दिवाळी... गाई म्हशी ओवाळी’अशा आनंद आणि प्रकाशाच्या उत्सवाला सोमवारी प्रारंभ झाला. गोरज मुहूर्तावर गाय-वासराचे पूजन करून घरोघरी दीपोत्सव झाला. वसुबारस ते भाऊबीज अशी सहा दिवस दिवाळी साजरी होणार आहे. दिवाळीखरेदीसाठी ग्राहकांची सोमवारी बाजारात झुंबड उडाली होती.
दिवाळीचा सण जसा प्रकाशाचा आहे, तसाच लक्ष्मीपूजनाचा म्हणूनच जास्त ओळखला जातो. दिवाळीतील सहाही दिवसांचे महत्त्व लक्ष्मीपूजेशी निगडित आहे. गोवत्स द्वादशीला गोवत्स (गाय आणि वासरु) पूजन झाले. गाय ही लक्ष्मी,समृद्धीचे प्रतीक आहे. घरात लक्ष्मीचे आगमन व्हावे, या हेतूने गायीचे पाडसासह पूजन केले जाते. शेतकरी वर्गात हा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. महिलांनी गायीच्या पायावर पाणी घालून पूजन केले. पंचारतीने गायींना ओवाळले. पारंपरिक पद्धतीने गायीला पुरणपोळी खाऊ घातली. मुला-बाळांना आरोग्य लाभावे,अशी प्रार्थना करून घरोघरी पणत्या प्रकाशमान झाल्या. गोवत्स द्वादशीने सहा दिवसांच्या दिवाळीला प्रारंभ झाल्याने शहरात चैतन्य संचारले. घरोघरी आकाशकंदील, विद्युत रोषणाई करण्यात आली. विद्युत रोषणाईच्या लखलखाटाने शहर उजळले आहे. पणत्या, विद्युत माळा, आकाशकंदील, रांगोळ््या खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती. (प्रतिनिधी)
धनत्रयोदशीला धन्वंतरी जयंती साजरी केली जाते. या दिनाचे आधुनिक महत्त्व स्पष्ट करताना येथील आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. लक्ष्मीकांत कोर्टीकर म्हणाले, धन्वंतरी देवता विष्णुरुप आहे. या देवतेच्या हाती अमृतकलश आहे. जगातील विकारांचा नाश करण्यासाठी या देवतेने जन्म घेतला आहे. जगात आजारी नाहीत, अशी ९० टक्के माणसे आहेत, मात्र ती अस्वस्थ आहेत. जीवनात स्वास्थ्य टिकविण्यासाठी काहीही झाले नसले तरी डॉक्टरांकडून तपासणी करून घेण्याची सुबुद्धी व्हावी, यासाठी धन्वंतरी पूजन आहे.
४मंगळवारी धनत्रयोदशी असल्याने सायंकाळी धनाची पूजा केली जाते. इंद्रदेवांनी समुद्रमंथन केले त्यावेळी लक्ष्मी प्रकट झाल्याने धनाची पूजा करण्याची प्रथा आहे.