श्रीरामपुरात तरूणाचा खून
By Admin | Updated: July 27, 2014 01:09 IST2014-07-26T23:26:26+5:302014-07-27T01:09:10+5:30
श्रीरामपूर : तोंडात चापट मारल्याच्या रागातून बाळासाहेब राजेंद्र लोंढे (रा. भैरवनाथनगर, श्रीरामपूर) या २५ वर्षीय तरूणाचा शुक्रवारी रात्री धारदार शस्त्रांनी भोसकून खून करण्यात आला.

श्रीरामपुरात तरूणाचा खून
श्रीरामपूर : तोंडात चापट मारल्याच्या रागातून बाळासाहेब राजेंद्र लोंढे (रा. भैरवनाथनगर, श्रीरामपूर) या २५ वर्षीय तरूणाचा शुक्रवारी रात्री धारदार शस्त्रांनी भोसकून खून करण्यात आला. ही घटना श्रीरामपूर शहरात मुख्य रस्त्यानजीक असलेल्या मैदानाजवळ घडली.
याबाबत मयताची मावशी वत्सला विनायक खुडे यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. खुडे यांच्या फिर्यादीनुसार घटनेची माहिती अशी: दस्तगीर शहा याच्याशी मयत बाळासाहेब याचे शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास किरकोळ वाद झाले. त्यातून बाळासाहेब याने दस्तगीरच्या तोंडात झापड मारली होती. हा राग मनात धरून रात्री नऊच्या सुमारास दस्तगीर, जावेद शहा व अरबाज या तिघांनी बाळासाहेब याला रस्त्यात गाठून धारदार शस्त्रांनी वार करून ठार केले. घटना घडल्यानंतर बाळासाहेब याची मावशी व इतर नातेवाईकांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी धाव घेतली. रात्री ३ वाजेपर्यंत मयताचे नातेवाईक पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अंबादास गांगुर्डे तपास करीत आहेत.
शनिवारी सकाळीच मातंग समाजाचे कार्यकर्ते नगरसेवक शाम आढांगळे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र होऊन पोलीस ठाण्यात आले. आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी करीत जमावाने पोलीस ठाण्यासमोरच नेवासा-संगमनेर रस्त्यावर रस्तारोको आंदोलन केले. नगरसेवक आढांगळे, भारतीय लहूजी सेनेचे राज्यप्रमुख बाळासाहेब बागूल, अरूण मंडलिक, संदीप मगर, अशोक बागूल, रमा धीवर, प्रकाश ढोकणे, सुभाष त्रिभुवन, विजय शेलार यांच्यासह महिलांनी उत्स्फूर्तपणे आंदोलनात सहभाग घेतला. महिलांनी तर आरोपींना आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी केली.
पोलीस निरीक्षक सुरेश सपकाळे यांनी आरोपींना लवकरात लवकर अटक करण्याचे आश्वासन दिले. आरोपी अटक केल्याशिवाय अंत्यसंस्कार करणार नाही, असे म्हणत कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता.
(प्रतिनिधी)
आरोपी फरार
दस्तगीर गफूर शेख, जावेद गफूर शहा व अरबाज (पूर्ण नाव माहीत नाही) या संजयनगरमधील आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघेही फरार आहेत. त्यांचा शोध सुरू आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकास ताब्यात घेतले आहे.