चाकूहल्ल्यात तरूणाचा खून
By Admin | Updated: August 21, 2014 23:06 IST2014-08-21T23:04:02+5:302014-08-21T23:06:03+5:30
संगमनेर : एकतर्फी प्रेमसंबंधामुळे समजावून सांगणाऱ्या सुरज कैलास जाधव (वय २२) या तरूणाचा धारधार चाकूने भोसकून खून केल्याची घटना गुरूवारी रात्री ९ वाजता शहरात घडली.

चाकूहल्ल्यात तरूणाचा खून
संगमनेर : एकतर्फी प्रेमसंबंधामुळे समजावून सांगणाऱ्या सुरज कैलास जाधव (वय २२) या तरूणाचा धारधार चाकूने भोसकून खून केल्याची घटना गुरूवारी रात्री ९ वाजता शहरात घडली. याप्रकरणी शहर पोलिसांनी ७ जणांविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला असून ६ आरोपींना अकोले व संगमनेरमध्ये अटक करण्यात आले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजापूर रोडवर ढोलेवाडी परिसरात राहणाऱ्या मयत सूरज जाधव याच्या बहिणीची काही दिवसांपूर्वी छेड काढल्याने भांडण झाले होते. गुरूवारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास सूरज जाधव हा मित्र निलेश रमेश ढोले व योगेश रमेश ढोले यांच्यासमवेत घरी जात असताना अकोले बायपासवरील पेटीट हायस्कूलसमोर विनायक गणपत भोर, सागर शंकर ढोले, मुकूंदा भरत ढोले, प्रसाद भारत ढोले, ज्ञानेश्वर मच्छिंद्र ढोले, वैभव गोरख ढोले व राजेंद्र जंबूकर (सर्व रा. ढोलेवाडी) यांनी त्यांना अडविले. दरम्यान एकतर्फी प्रेमसंबंधातून सूरज हा ज्ञानेश्वर ढोले यास समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत असताना आरोपींनी संगनमताने सुरज, निलेश व योगेश यांना शिवीगाळ व दमदाटी करून लाथा-बुक्याने मारहाण करीत सशस्त्र हल्ला केला. यातील आरोपी विनायक भोर याने हातातील धारधार चाकूने सुरज जाधव याच्या छातीवर सपासप वार केले. या हल्यात सूरजसह निलेश, योगेश व सागर ढोले असे चौघे गंभीर जखमी झाले. घटनेनंतर सर्व आरोपी पळून गेले. जखमींवर एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करून प्रकृती चिंताजनक असल्याने सूरज यास नाशिकला हलविण्यात आले. परंतू प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने सूरजचा मृत्यू झाला.
याप्रकरणी निलेश ढोले याने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी वरील ७ आरोपींविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक श्याम सोमवंशी अधिक तपास करीत असून ५ आरोपींना पहाटे अकोले व संगमनेर येथून अटक करण्यात आली आहे.
(प्रतिनिधी)
‘सूरज’चे वडील काही दिवसांपूर्वी मयत झाले असून त्याला एक बहीण व लहान भाऊ आहे. तो औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात शिक्षण घेवून वेल्डींगची कामे करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करीत होता.
मयत ‘सूरज’चा मृतदेह नाशिकहून थेट शहर पोलिस ठाण्यात नेण्यात आला. सूरजच्या मारेकऱ्यांना अटक न केल्यास अंत्यसंस्कार न करण्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला. पोलिस निरीक्षक श्याम सोमवंशी यांनी आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह हलविण्यात आला.