दक्षिणेत रब्बीच्या पेरण्या सुरू
By Admin | Updated: August 23, 2014 00:44 IST2014-08-22T23:08:26+5:302014-08-23T00:44:41+5:30
अहमदनगर : आॅगस्ट महिन्याचे अखेरचे आठ दिवस शिल्लक राहिले आहेत. जिल्ह्यात बहुतांशी भागात परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे.

दक्षिणेत रब्बीच्या पेरण्या सुरू
अहमदनगर : आॅगस्ट महिन्याचे अखेरचे आठ दिवस शिल्लक राहिले आहेत. जिल्ह्यात बहुतांशी भागात परतीच्या पावसाला सुरूवात झाली आहे. विशेष करून जिल्ह्याच्या दक्षिण भागातील नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत-जामखेड, शेवगाव आणि पाथर्डीच्या काही भागात रब्बी हंगामाची लगबग सुरू झाली आहे. रब्बी हंगामासाठी पेरण्या सुरू झाल्या असून खरीप वाया गेल्यानंतर शेतकऱ्यांची आशा रब्बीवर आहेत. मघा नक्षत्रात अनेक ठिकाणी दमदार पावसाने हजेरी लावली आहे.
मुळा आणि भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडणारा धोधो पाऊस आता जवळजवळ मंदावला आहे. दोन्ही धरणातील पाणीसाठा समाधानकारक झाल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. या धरणाच्या पाण्यावर जिल्ह्यातील बहुतांशी शेती अवलंबून असल्याने सर्वांच्या नजरा धरणाच्या पाणीसाठ्यावर खिळल्या होत्या. उर्वरित जिल्ह्यात पावसाअभावी खरिपासाठी अवघी ५० टक्केपेरणी झाली होती. यातील निम्म्यांहून अधिक पिके करपली होती. मात्र, परतीच्या पावसाने अनेक ठिकाणी दिलासा मिळाला आहे. विशेष करून पेरलेल्या कांद्यासाठी हा पाऊस जीवनदायी ठरणार आहे.
नगर जिल्हा प्रामुख्याने रब्बी हंगामाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, अलिकडच्या काही वर्षात जिल्ह्यात खरीप हंगामात कांदा, कापूस, सोयाबीन या नगदी पिकांचे प्रमाण वाढले. मात्र, तीन-चार वर्षापासून गेल्या वर्षीचा अपवाद वगळता जिल्ह्यात सुरूवातीच्या दोन महिन्यांत पाऊस पडलेला नाही. यामुळे शेतीचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. भर उन्हाळ्यात टँकरलावून जीवंत ठेवलेल्या फळबागांची आजची स्थिती दयनिय झाली आहे. मात्र परतीच्या पावसाला सुरूवात झाली असल्याने शेतकऱ्यांची रब्बीसाठी आशा पल्लवित झाल्या आहेत.
जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी ७ लाख ८८ हजार क्षेत्र प्रस्तावित करण्यात आलेले आहे. यात ज्वारी पिकाचे क्षेत्र सर्वाधिक ५ लाख २७ हजार हेक्टर, सव्वा लाख हेक्टर गहू, १४ हजार २०० हेक्टर मका, एक लाख हेक्टर हरभरा आणि अन्य पिकांचे क्षेत्राचा समावेश करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने रब्बी हंगामासाठी २ लाख ५१ हजार मेट्रीक टन खतांची मागणी नोंदविली आहे. यात १ लाख मेट्रीक टन युरिया, १५ हजार मेट्रीक टन डीएपी, १० हजार मेट्रीक टन एमओपी, ३० हजार एसएसपी, ९६ हजार मेट्रीक टन संयुक्त खतांचा समावेश आहे.
(प्रतिनिधी)
गोकुळाष्टमी झाल्यानंतर दक्षिण जिल्ह्यातील पाच तालुक्यात ज्वारीची पेरणी सुरू होते. जामखेड तालुक्यात पुढील महिन्यांत ज्वारीची पेरणी होईल. गहू आणि हरभरा पिकासाठी आॅक्टोबर महिन्यात पेरणी होते, विशेष करून या दोन्ही पिकांसाठी थंडीची आवश्यकता असते.
गव्हासाठी ४८ हजार क्विंटल, ज्वारीसाठी ५ हजार २०० क्ंिवटल, हरभरा पिकासाठी १५ हजार क्विंटल बियाणांची मागणी नोंदविण्यात आली आहे. यातील ज्वारी बियाणे तातडीने आवश्यक असल्याने सुमारे एक हजार क्विंटल बियाणे उपलब्ध झाले असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी विलास नलगे यांनी दिली. ं