अहमदनगर : शिक्षक बँकेची आगामी निवडणूक लक्षात घेऊन गेली पाच वर्षे झोपी गेलेले विरोधी मंडळे जागे झाले असून, बिनबुडाचे आरोप करीत आहेत; परंतु संचालक मंडळाने अवघ्या सव्वाटक्क्याच्या फरकाने राज्यात आदर्श ठरावा असा कारभार बँकेत केला आहे. त्यामुळे या संचालक मंडळाविरोधात कोणाचीही डाळ शिजणार नाही, हे लक्षात आले व सर्व विरोधकांना एक व्हावे लागले, हेच गुरुमाऊली मंडळाचे मोठे यश आहे. शिक्षक बँकेची निवडणूक स्वबळावर लढवून मोठ्या फरकाने आम्ही विजयी होऊ, असा विश्वास राज्य संघाचे उपाध्यक्ष दत्तापाटील कुलट यांनी व्यक्त केला.
वार्षिक सभा आली की, प्रसिद्धी मिळविण्यासाठी पत्रकबाजी करणाऱ्या आणि प्रत्यक्ष आचरणात विसंगती असणाऱ्या लोकांना जिल्ह्यातील सभासद चांगले ओळखून आहेत. शिक्षक बँकेचा कारभार सर्व सभासदांसाठी खुला असून कोणीही, कधीही बँकेत येऊन त्याची खातरजमा करू शकतो. बिनबुडाचे आरोप करून विरोधक फक्त स्वतःचे हसे करून घेत आहेत, असे गुरुमाऊली मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब तांबे यांनी सांगितले.
रविवारी होणाऱ्या शिक्षक बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बँकेचे अध्यक्ष राजू रहाणे, उपाध्यक्ष उषाताई बनकर, ज्येष्ठ संचालक सलीमखान पठाण, माजी अध्यक्ष संतोष दुसुंगे, शरद सुद्रिक, साहेबराव अनाप, विद्याताई आढाव, बाळासाहेब मुखेकर, अर्जुन शिरसाठ, बाबासाहेब खरात, किसन खेमनर, गंगाराम गोडे, अनिल भवार, सुयोग पवार यांच्यासह गुरुमाऊली मंडळाचे नेते गोकुळ कळमकर, नगरपालिका संघाचे जिल्हाध्यक्ष मच्छिंद्र लोखंडे, अनिल टकले, बाळासाहेब सरोदे, विठ्ठल फुंदे, बाळासाहेब तापकीर, पी.डी. सोनवणे, आर.टी. साबळे, संदीप मोटे, अशोक गिरी, राजेंद्र सदगीर, मारुती गायकवाड, रामेश्वर चोपडे, निवृत्ती गोरे, किसन वराट आदी उपस्थित होते.
..........................
कार्यक्षेत्र वाढल्यास बँकच मोठी होणार
बँकेचे कार्यक्षेत्र राज्यभर करण्याबाबत विरोधकांनी वावड्या उठवण्यास सुरुवात केली आहे. कार्यक्षेत्र वाढविल्याने बँकेच्या व्यवसायिक उत्पन्नात भर पडणार असून, त्याचा फायदा सभासदांना होणार आहे. उलट शिक्षकांची बँक यातून मोठी होणार आहे. मात्र, बँक मोठी करण्यापेक्षा बँकेच्या चांगल्या कामात विरोधक खोडा घालण्यात धन्यता मानत आहेत, असे गुरुमाऊली मंडळाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार साळवे यांनी सांगितले.
........................
बँकेचे काम राज्यात आदर्श
शिक्षक बँकेमध्ये कायम ठेवीवर सर्वोच्च व्याज देण्याचा नियम मागच्या वर्षी केला. यावेळी कर्जाचा व्याजदर आणि ठेवीचे व्याजदर यामध्ये तीन टक्क्यांच्या फरकाचा पोटनियम दुरुस्त केला जात असून, भविष्यात कोणतेही मंडळ सत्तेत आल्यास त्यांना या सीमारेषेच्या बाहेर जाता येणार नाही. विद्यमान संचालक मंडळाने अवघ्या सव्वाटक्क्याच्या फरकाने कारभार करून राज्यामध्ये एक आदर्श निर्माण केला आहे, असे अध्यक्ष संतोष दुसुंगे यांनी सांगितले.