सोशल मीडियाचे दिले धडे
By Admin | Updated: July 20, 2014 00:21 IST2014-07-19T23:15:20+5:302014-07-20T00:21:49+5:30
अहमदनगर : लोकसभा निवडणुकामध्ये भाजपाने सोशल मीडियाचा प्रभावी वापर करीत काँग्रेसचा पराभव केला. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही सोशल मीडियाचा वापर करत पक्षाचे ध्येय
सोशल मीडियाचे दिले धडे
अहमदनगर : लोकसभा निवडणुकामध्ये भाजपाने सोशल मीडियाचा प्रभावी वापर करीत काँग्रेसचा पराभव केला. यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही सोशल मीडियाचा वापर करत पक्षाचे ध्येय, धोरणे सामान्य मतदारापर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. यासाठी काँग्रेसच्या वतीने खासगी एनजीओच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची कार्यशाळा घेत प्रबोधन केले. यावेळी स्वत: मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्वशीला चव्हाण यांनी उपस्थितांना ‘शिका आणि संघटीत व्हा’, एकसंघ रहा असा संदेश दिला.
काँग्रेसच्या जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघातील निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजित करण्यात आले होते. चव्हाण यांच्या सोबत मुंबईहून आलेल्या एनजीओच्या प्राध्यापकांनी कार्यकर्त्यांना खेळ, प्रश्न मंजुषा, बौध्दिक चाचणीच्या आधारे सकारात्मक विचार, यशाचे पंचकोन, संघटितपणे काम याचे धडे दिले.
कार्यशाळेला जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्य आणि युवक व महिला सदस्य उपस्थित होते. यावेळी एनजीओच्या टीमने प्रत्येक कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षात का रहावे असे वाटते. पक्षाचे ध्यये काय असावे, धोरण काय असावे, सकारात्मक विचार कसे निर्माण करावेत, भाजपाच्या चुकीच्या निर्णयाचा माहिती पक्ष कार्यकर्त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून कशा प्रकारे सामान्यांपर्यंत पोहचावी याचे प्रशिक्षण देण्यात आले.
कार्यशाळेत चव्हाण स्वत: सामान्य कार्यकर्त्यांत बसून तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन ऐकत होत्या. शेवटी उपस्थित पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून येणारे निर्णय व्यवस्थित तळागाळा पर्यंत न गेल्यास त्याची अनावस्था होती, हे यावेळी सोदाहरण स्पष्ट करून देण्यात आले. तसेच आतापर्यंत जे झाले विसरून जा, असे सांगत एक संघ राहण्याचा संदेश त्यांनी यावेळी दिला.
कार्यशाळेला जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, ब्रिजलाल सारडा, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ, डॉ. भास्करराव खडे, सभापती शिवाजी गाडे, अंबादास पिसाळ, युवकचे अध्यक्ष हेमंत ओगले, राहुल झावरे, सविता मोरे, रईसा शेख, संध्या मेढे यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कार्यकर्त्यांना दिले चॉकलेट
कार्यशाळेला जिल्ह्यातील पक्षाचे प्रमुख नेते गैरहजर होते. काही प्रमुख नेत्यांनी हजेरी लावून गेले. मात्र, सामान्य कार्यकर्ता शेवटपर्यंत उपस्थित होता. कार्यशाळेत सर्वाधिक प्रश्नाची उत्तरे देणाऱ्या कार्यकर्त्यांना चॉकलेट देण्यात आले.
माध्यमांना टाळले
कार्यशाळेबाबत माहिती देण्यास मुख्यमंत्री चव्हाण यांच्या पत्नीने स्पष्ट शब्दात नकार दिला. हा पक्षांतर्गांतील विषय असून प्रसिध्दी माध्यमांनी यापासून लांब राहण्यास त्यांनी सांगितले. पक्षातील गटबाजी बाबत त्यांना काही कार्यकर्त्यांनी सांगितले. मात्र, त्यावर त्यांनी उत्तर दिले नाही.