एसएमएस दाखवून भरता येणार वीजबील
By Admin | Updated: July 4, 2017 15:18 IST2017-07-04T15:18:50+5:302017-07-04T15:18:50+5:30
मोबाईलवर देण्यात आलेल्या एसएमएसच्या आधारावर वीजबील भरण्याची सुविधा महावितरणने ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे.

एसएमएस दाखवून भरता येणार वीजबील
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : मोबाईलवर देण्यात आलेल्या एसएमएसच्या आधारावर वीजबील भरण्याची सुविधा महावितरणने ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येणार असल्याचे महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजीवकुमार यांनी सांगितले.
अहमदनगर जिल्ह्यातील ३ लाख १३ हजार ३०० ग्राहकांनी (कृषीपंप ग्राहक वगळून) त्यांचे मोबाईल क्रमांक नोंदविले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील एकूण ग्राहकसंख्येपैकी जवळपास ५३ टक्के ग्राहक मोबाईल क्रमांक नोंदणीच्या माध्यमातून महावितरणशी जोडलेले आहेत. या ग्राहकांना महावितरणच्या वीजबिलाचा तपशील एसएमएसद्वारे संबंधित मोबाईलवर पाठविण्यात येतो. या एसएमएसमध्ये ग्राहक क्रमांक, वीज बिलाची रक्कम तसेच वीजबील भरण्याची अंतिम तारीख याचा समावेश असतो. अशा ग्राहकांना आता मोबाईलवरील एसएमएस दाखवून महावितरणच्या वीजबील भरणा केंद्रात वीजबील भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचा लाभ अहमदनगर जिल्ह्यातील मोबाइल नोंदणी केलेल्या ग्राहकांना घेता येणार आहे.