भूमिअभिलेख कार्यालयाच्या इमारतीचा स्लॅब कोसळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:36 IST2020-12-16T04:36:29+5:302020-12-16T04:36:29+5:30
अहमदनगर : सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रशासकीय इमारत नादुरुस्त झाल्यास तात्काळ दुरुस्ती होते; परंतु अन्य शासकीय कार्यालयांकडून वर्षानुवर्षे पाठपुरावा करूनदेखील ...

भूमिअभिलेख कार्यालयाच्या इमारतीचा स्लॅब कोसळला
अहमदनगर : सार्वजनिक बांधकाम विभागाची प्रशासकीय इमारत नादुरुस्त झाल्यास तात्काळ दुरुस्ती होते; परंतु अन्य शासकीय कार्यालयांकडून वर्षानुवर्षे पाठपुरावा करूनदेखील दुरुस्ती होत नाही. जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयाने अनेक वेळा पत्रव्यवहार करूनदेखील इमारतीची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह अभ्यागतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
येथील नगर तालुका तहसील कार्यालयासमोर जिल्हा भूमिअभिलेख कार्यालय आहे. हे कार्यालय नव्याने उभारण्यात आलेल्या समोरच्या इमारतीत सुरू करण्यात आले आहे. ही इमारत नवीन आहे. कार्यालयाच्या बैठक कक्षाच्या छताचा स्लॅब अचानक कोसळला. त्यामुळे संगणकाचे नुकसान झाले. बैठक कक्षासह जिल्हा अधीक्षकांच्या दालनासमोर असलेल्या गॅलरीच्या भिंतीला आतून पांढऱ्या रंगाच्या फरशा बसविण्यात आलेल्या आहेत. नवीन इमारतीमधील फरशा निखळल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
जिल्हा भूमिअभिलेख कार्यालयात महिला कर्मचारी कार्यरत आहेत. इमारत बांधताना महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छतागृह बांधणे गरजेचे होते; परंतु ठेकेदाराने महिलांसाठी स्वच्छतागृह बांधले नाही. स्वच्छतागृह बांधून मिळावे, यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वेळोवेळी पाठपुरवा केला. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे दोन वर्षे उलटूनही महिलांसाठी स्वच्छतागृह तयार केले गेले नाही. त्यामुळे महिला कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे.
...
सूचना फोटो आहे.
...