समाजाची परीट घडी विस्कटलेलीच...
By Admin | Updated: December 19, 2015 23:48 IST2015-12-19T23:40:43+5:302015-12-19T23:48:04+5:30
अहमदनगर : वर्षानुवर्षे कपडे धुणे आणि त्याला इस्त्री करण्याचा व्यवसाय करणाऱ्या परीट समाजाची घडी अद्याप विस्कटलेली आहे.

समाजाची परीट घडी विस्कटलेलीच...
अहमदनगर : वर्षानुवर्षे कपडे धुणे आणि त्याला इस्त्री करण्याचा व्यवसाय करणाऱ्या परीट समाजाची घडी अद्याप विस्कटलेली आहे. या समाजातील बहुतांशी कुटुंब आजही हलाखीचे जीवन जगत असून त्यांच्याकडे ना सरकारचे लक्ष, ना बँका त्यांना कर्ज उपलब्ध करू देत असल्याने अनेक हलाखीचे जीवन जगत आहेत. हळूहळू या समाजातील मुले-मुली शिक्षण घेत असून त्यांना शिक्षणात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी जोर धरत आहे.
नगर जिल्ह्यात साधारण चार हजारांच्या जवळपास परीट समाजातील कुटुंबांचे वास्तव्य आहे. यातील साधारण ६०० कु टुंब नगरमध्ये राहतात. ग्रामीण भागात राहणाऱ्या
बहुतांशी कुटुंबाचा व्यवसाय कपड्यांना इस्त्री करण्याचा आहे. शहरात काही प्रमाणात या समाजातील तरुण अन्य व्यवसाय अथवा नोकरीत प्रवेश करताना दिसत आहेत. नोकरीत अनेक ठिकाणी या समाजातील व्यक्ती वरिष्ठपदावर पोहचल्या आहेत. व्यवसाय करणाऱ्या परीट कुटुंबासमोर अनंत अडचणी असून सरकारचे त्याकडे दुर्लक्ष आहे. या समाजाला व्यवसायासाठी आवश्यक असणारी अत्याधुनिक साधनसामग्री आणि भांडवल उपलब्ध करून सरकारकडून प्रतिसाद मिळत नाही. बँकांचे उंबरठे झिजवूनही कर्ज मिळत नसल्याने या समाजातील तरुण त्रस्त असल्याची खंत परीट समाजाचे शहराध्यक्ष शंकर सोनवणे यांनी व्यक्त केली.
अलीकडच्या काही वर्षात समाजातील तरुण एकत्र येत आहेत. यातून समाज संघटना मजबूत होत असून या समाजाला ओबीसी ऐवजी विशेष दर्जा देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ओबीसी प्रवर्गात १९ टक्के जागा राखीव आहेत. मात्र, ओबीसी प्रवर्गात २९ हून अधिक जातींचा समावेश आहे. यामुळे ओबीसी प्रवर्गात गर्दी झाली असून यामुळे परीट समाजाला विशेष आरक्षणाची गरज असल्याचे समाजाचे म्हणणे आहे. याच सोबत कपड्यांना इस्त्री करण्याचा व्यवसाय करणाऱ्या व्यवसायिकांना सरकारने वीज बिलात सवलत द्यावी, अशी मागणी सोनवणे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
सारसनगर भागात परीट समाज मंदिराला समाज मंदिरासाठी दहा गुंठे जागा देण्यात आलेली आहे. या ठिकाणी संत गाडगे बाबा यांचे मंदिर आणि सभामंडप उभारण्यात आले आहे. या ठिकाणी जयपूर येथून गाडगेबाबा यांची मूर्ती आणण्यात येणार आहे. सध्या इथे समाजाच्या बैठका, हळदी-कुंकुम उत्सव साजरे करण्यात येत आहेत. तसेच दररोज समाजबांधवांपैकी कोणीतरी एकजण आलटून पालटून दिवाबत्ती करत असल्याची माहिती सोनवणे यांनी दिली.
राज्य सरकारकडून अनेक वर्षापासून धोबी समाजावर अन्याय सुरू आहे. यात मागील महिन्यात राज्य सरकारने छापलेल्या परिपत्रकात गाडगेबाबा जयंती व पुण्यतिथी साजरी करण्याचा उल्लेख टाळलेला आहे. सरकारचे हे परिपत्रक धुळे येथील धोबी समाजातील कार्यकर्त्यांच्या हाती लागले आहे. सरकारच्या कृतीचा निषेध म्हणून लवकर या विरोधात समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे.
- सुनील दळवी, परीट समाज राज्य पदाधिकारी.