लग्नमंडपातून अल्पवयीन नवरीची ‘सैराट’ धूम

By Admin | Updated: May 20, 2016 23:57 IST2016-05-20T23:49:38+5:302016-05-20T23:57:57+5:30

संगमनेर : अल्पवयीन नवरीने लग्नमंडपातून बॉयफे्रण्डसोबत धूम ठोकल्याची घटना संगमनेरात घडली आहे़

Shutup Dhoom | लग्नमंडपातून अल्पवयीन नवरीची ‘सैराट’ धूम

लग्नमंडपातून अल्पवयीन नवरीची ‘सैराट’ धूम

संगमनेर : अल्पवयीन नवरीने लग्नमंडपातून बॉयफे्रण्डसोबत धूम ठोकल्याची घटना संगमनेरात घडली आहे़ विशेष म्हणजे या मुलीने आई- वडिलांसह नवरदेव व होणाऱ्या सासूविरोधात पोलिसात तक्रारही दिली आहे.
संगमनेर शहरानजीकच्या एका वस्तीत पती-पत्नी आणि त्यांचा मुलगा व मुलगी असे चौघांचे कुटुंब राहत आहे़ याच कुटुंबातील १५ वर्षीय मुलीचे एका तरुणावर प्रेम जडले़ हा मुलगा अहमदनगरमधील असून, तो संगमनेरच्या नातेवाईकांकडे गेला होता़ तेथेच या दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले़ ही बाब मुलीच्या आई-वडिलांना समजल्यानंतर त्यांनी तिचा विवाह घुलेवाडीतील एका तरुणाशी लावून देण्याचे ठरविले़ तिच्या इच्छेविरुद्ध विवाह जमविल्याने तिची घुसमट सुरू झाली़ ती अल्पवयीन असल्याचे नवरदेवासह त्याच्या नातेवाईकांनाही माहीत होते़ तरीही १६ मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता विवाह मुहूर्त ठरविण्यात आला़ लग्नाची जय्यत तयारी करण्यात आली़ सर्व नातेवाईकांना निमंत्रणे धाडली़ ठरल्याप्रमाणे १६ मे रोजी सायंकाळी या मुलीचा विवाह साजरा होत होता़ सनई-चौघड्यांच्या मंगल स्वरात हा लग्नविधी झाला़ मुलीवर अक्षदाही पडल्या़ सर्वजण जेवणाचा आस्वाद घेत असतानाच तिच्या जुन्या बॉयफे्रण्डची मंडपात एन्ट्री झाली़ नवऱ्या मुलास नवरी घास भरवित असतानाच आपल्या बॉयफे्रण्डला पाहून तिने हात आखडता घेतला अन् कोणाला काही समजण्याच्या आतच तिने लग्नमंडपातून बॉयफ्रेण्डसोबत धूम ठोकली़
प्रियकरासोबत पळ काढणाऱ्या या मुलीला नातेवाईकांनी पाठलाग करुन पकडले़ तिला घरी नेण्यात आले़ समजूत काढली आणि काही रट्टेही दिले़ मात्र, तीन दिवसांनंतर गुरुवारी रात्री तिने कोणाला काहीही न सांगताच संगमनेर पोलीस ठाणे गाठले़ झालेली हकीकत पोलिसांसमोर कथन केली़ मुलीच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी आई-वडिलांसह नवरदेव व सासू अशा चार जणांविरुद्ध फिर्याद नोंदविली. अल्पवयीन मुलीस बालविवाह करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी मुलीच्या आई-वडिलांसह, नवरदेव, सासू यांना पोलिसांनी अटक केली़ शुक्रवारी दुपारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चौघांनाही ३१ मेपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे़ पुढील तपास पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे करीत आहेत.
(प्रतिनिधी)

Web Title: Shutup Dhoom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.