महिलेच्या मृत्युप्रकरणी श्रीरामपूरच्या डॉक्टरला मागितली दहा लाखांची खंडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 15:59 IST2019-12-11T15:59:04+5:302019-12-11T15:59:32+5:30
श्रीरामपूर शहरातील डॉ.संजय शंकर अनारसे यांना महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप करत १० लाख रुपये खंडणी मागून धमकी देणारे तिघे आरोपी फरार झाले आहेत.

महिलेच्या मृत्युप्रकरणी श्रीरामपूरच्या डॉक्टरला मागितली दहा लाखांची खंडणी
श्रीरामपूर : शहरातील डॉ.संजय शंकर अनारसे यांना महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप करत १० लाख रुपये खंडणी मागून धमकी देणारे तिघे आरोपी फरार झाले आहेत. पोलीस त्यांच्या मागावर असून लवकरच त्यांना ताब्यात घेऊ असा विश्वास व्यक्त त्यांनी व्यक्त केला आहे.
आरोपींनी डॉ.अनारसे यांच्यावर अॅट्रॉसिटी अन्वये गुन्हा दाखल करण्याची धमकीही दिली होती. या धमकीला वैैतागून अखेर अनारसे यांनी पोलिसांत तक्रार देण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी रात्री उशिरा याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला. आरोपींमध्ये शहरातील समीर माळवे, तसेच रमेश गायकवाड व माधवी गायकवाड (कल्याण) यांचा समावेश आहे. हे सर्व फरार झाले आहेत.
रुग्ण उर्मिला रमेश गायकवाड यांच्या पोटात गोळा असल्याने २१ आॅक्टोबरला डॉ.अनारसे रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर २४ आॅक्टोबरला शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर दोन दिवसांनी तब्येत बिघडल्यामुळे त्यांना संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेही प्रकृती न सुधारल्यामुळे नगर येथे उपचारासाठी नेण्यात आले. मात्र तेथेही उर्मिला यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊ शकली नाही. अखेर २७ आॅक्टोबर रोजी त्यांचा मृत्यू झाला.
उपचारादरम्यान डॉ.संजय अनारसे यांनी हलगर्जीपणा केला व त्यामुळे उर्मिला यांचा मृत्यू झाला, असा आरोप समीर माळवे, रमेश गायकवाड व माधवी गायकवाड यांनी केला. रुग्णालयाची बदनामी करण्याची धमकी देत १० लाख रुपये खंडणी मागितली. जिवे मारण्याची तसेच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. आरोपींवर खंडणीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.