श्रीरामपूरमध्ये गोळी झाडून युवकाचा खून
By Admin | Updated: July 1, 2014 00:18 IST2014-06-30T23:38:10+5:302014-07-01T00:18:02+5:30
श्रीरामपूर : टिळकनगर येथे रविवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास आदेश प्रकाश लोखंडे या १६ वर्षीय तरुणाचा पिस्तुलातून गोळी झाडून खून करण्यात आला.

श्रीरामपूरमध्ये गोळी झाडून युवकाचा खून
श्रीरामपूर : टिळकनगर येथे रविवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास आदेश प्रकाश लोखंडे या १६ वर्षीय तरुणाचा पिस्तुलातून गोळी झाडून खून करण्यात आला. याप्रकरणी रिपब्लिकन पक्षाचे उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष भीमा बागुल यांना अटक करण्यात आली आहे. तर युवक रिपब्लिकन पक्षाचा पदाधिकारी सागर भोसले व इतर आरोपी फरार आहेत. दरम्यान, अन्य तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
माया दीपक शिंदे हल्ली (रा. सोनवणे वस्ती, टिळकनगर (पूर्वीचा पत्ता बुरुडगांव रोड, भोसले आखाडा, अहमदनगर) यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात १४ आरोपींसह सुमारे ३० अनोळखी आरोपींविरुध्द गुन्हा नोंदविला. आरोपी भीमा बागुल, सागर श्रावण भोसले, योगेश कारभारी त्रिभुवन, सिध्दार्थ बागुल, बाबा बनसोडे, किरण लोळगे, सागर दत्ता लोळगे, बबन माघाडे, शरद कोरडे, सचिन सोनवणे, अजय पांडुरंग शिंदे
व अन्य २५ ते ३० अनोळखी आरोपींनी (सर्व रा. टिळकनगर व दत्तनगर) सुमारास मोटारसायकलचा धक्का लागल्याच्या कारणातून रविवार २९ जूनच्या रात्री १२ च्या सुमारास हातात घातक शस्त्रे व अग्निशस्त्रे, लाठ्या, काठ्या घेऊन फिर्यादीची आई छाया पटारे, वडील प्रकाश पटारे, मामा, मावसभाऊ आदेश प्रकाश लोखंडे यांच्यावर पिस्तुलने गोळी झाडली. यात आदेशचा खून झाला. त्याला साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी रात्री नेले होते, परंतु तो मृत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
जखमीवर उपचार सुरु आहेत. घटनास्थळी पोलीस उपअधीक्षक अंबादास गांगुर्डे, निरीक्षक सुरेश सपकाळे व पोलीसांनी भेट देऊन माहिती घेतली.
टिळकनगर येथे वातावरण तणावग्रस्त बनले असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. (प्रतिनिधी/वार्ताहर)
अटकेतील आरोपी
पोलिसांनी भीमा बागुल, बाबा माघाडे, शरद कोरडे या तिघांना अटक केली. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा व विनापरवाना शस्त्रे वापरून जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून गुन्हा नोंदविण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक मनोजकुमार राठोड तपास करीत आहेत.