श्रीरामपुरात पुन्हा गंठण चोराची धूम
By Admin | Updated: April 26, 2017 20:01 IST2017-04-26T20:01:31+5:302017-04-26T20:01:31+5:30
बेलापूर रस्त्यावर मंगळवारी रात्री ८ वाजता दुचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील १५ ग्रॅम सोन्याचे गंठण ओरबाडून नेले.

श्रीरामपुरात पुन्हा गंठण चोराची धूम
श रीरामपूर : बेलापूर रस्त्यावर मंगळवारी रात्री ८ वाजता दुचाकीवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी एका महिलेच्या गळ्यातील १५ ग्रॅम सोन्याचे गंठण ओरबाडून नेले.ही घटना अपना बाजार व चंदूकाका ज्वेलर्सच्या समोर घडली. महिला पोलीस ठाण्यात गंठण चोरीची फिर्याद नोंदविण्यास गेली असता फिर्याद नोंदविण्यात टाळाटाळ करुन बुधवारी या, असे तिला सांगण्यात आले. वंदना सुरेश झांजरी या सोनल झांजरी यांच्या मागे बसून स्कूटरवरुन रात्री ८ वाजता प्रवरा कालव्याच्या रस्त्याकडे येत होत्या. चंदुकाका ज्वेलर्सच्या पुढे त्या आल्या असता विना क्रमांकाच्या मोटार सायकलवरुन आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी वंदना यांच्या गळ्यातील १५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण ओरबाडून नेले. त्याची किंमत सुमारे ५० हजार रुपये आहे. गंठण ओरबडल्यानंतर सोनल झांजरी यांनी मोटार सायकलवरील दोन भामट्यांचा पाठलाग केला. मेनरोडवर डंबीर यांच्या भांड्याच्या दुकानापर्यत गेल्या, परंतू चोरटे फरार झाले. यावेळी गर्दी जमली होती. वंदना झांजरी या रात्री ९ वाजता पोलीस ठाण्यात गंठण चोरीची फिर्याद नोंदविण्यास गेल्या. पण त्यांना बुधवारी दुपारी या असे सांगून त्यांची फिर्याद नोंदविण्यास टाळाटाळ करण्यात आली.