श्रीगोंद्याच्या कोहळ्याने वाढविला आग्राच्या पेठा मिठाईचा स्वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 11:42 IST2020-10-04T11:40:31+5:302020-10-04T11:42:01+5:30
श्रीगोंदा तालुक्यातील शेतक-यांनी सेंद्रिय पद्धतीने तयार केलेल्या कोहळ्याने आग्राच्या जगप्रसिद्ध पेठा मिठाईचा स्वाद वाढविला आहे. येथील कोहळ्याला तेथील दुकानदार पसंती देऊ लागले आहेत. जंगलेवाडी, लिंपणगावातील शेतकरी याचे उत्पादन घेत आहेत.

श्रीगोंद्याच्या कोहळ्याने वाढविला आग्राच्या पेठा मिठाईचा स्वाद
बाळासाहेब काकडे ।
श्रीगोंदा : तालुक्यातील शेतक-यांनी सेंद्रिय पद्धतीने तयार केलेल्या कोहळ्याने आग्राच्या जगप्रसिद्ध पेठा मिठाईचा स्वाद वाढविला आहे. येथील कोहळ्याला तेथील दुकानदार पसंती देऊ लागले आहेत. जंगलेवाडी, लिंपणगावातील शेतकरी याचे उत्पादन घेत आहेत.
कोहळा मूळचा जपान, इंडोनेशियातील असून नंतर त्याचा प्रसार इतर प्रदेशात झाला. पंजाब, पश्चिम बंगाल, गुजरात आणि महाराष्ट्रातील काही भागात कोहळ्याची लागवड केली जाते. हे पीक चार महिन्यांमध्ये घेतले जाते. कृषीतज्ज्ञ राहुल पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली चिखलठाणवाडी येथील शेतकरी बापूराव आप्पासाहेब धांडे, अनिल रोडे, अनिल जंगले (जंगलेवाडी), नंदकुमार कोकाटे (लिंपणगाव) यांनीही सेंद्रिय पद्धतीने कोहळा फुलविला. येथील कोहळ्याचा गर पेठा मिठाई तयार करण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे शेतक-यांना चांगला भावही मिळत आहे.
मी रासायनिक पद्धतीने भाजीपाला पिकवित होतो. कृषीमित्र राहुल पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली सेंद्रिय पद्धतीने कोहळा व इतर भाजीपाला लागवड करत आहे. कमी खर्चात चांगले उत्पन्न मिळाले, असे चिखलठाणवाडीचे शेतकरी बापूराव धांडे यांनी सांगितले. एक कोहळा दोन ते तीन किलोपर्यंत भरतो. पंधरा रूपये किलोप्रमाणे भाव मिळतो. एकरी १० टन माल निघतो. चार महिन्यात दीड लाखापर्यंत उत्पन्न मिळते.
औषधी गुणधर्म...
कोहळा हा शीत, लघु, स्निग्ध, मधूर, गुणात्मक, बुद्धीवर्धक, वात-पित्तशामक आहे. यामध्ये कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, प्रथिने तंतुमय व पिष्टमय पदार्थ, ‘अ’ आणि ‘ब’ जीवनसत्त्व विपूल प्रमाणात असते. कोहळा सूप किंवा रस पिल्याने मेंदूचा थकवा जाऊन उत्साह वाढतो.
-डॉ. अरुण रोडे, डॉ. अनिल घोडके, श्रीगोंदा.
मानवी आरोग्याच्या दृष्टीने सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला फळे, कांदा व इतर शेती करणे आवश्यक झाले आहे. तालुक्यातील शेतक-यांनी मोठ्या प्रमाणावर अशी शेती केल्यास कृषीमालाचा वेगळा ब्रॅण्ड तयार होऊ शकतो.
-पद्मनाभ म्हस्के, तालुका कृषी अधिकारी, श्रीगोंदा.