दुकाने उघडली, लग्न सोहळेही सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:15 IST2021-06-05T04:15:57+5:302021-06-05T04:15:57+5:30
गावोगाव प्रशासनाने कारवाईचा बडगा हाती घेतला आहे. नांदुर्खी येथे विनापरवाना व जास्त गर्दी जमवून लग्न सोहळा साजरा करणाऱ्यांवर शिर्डीचे ...

दुकाने उघडली, लग्न सोहळेही सुरू
गावोगाव प्रशासनाने कारवाईचा बडगा हाती घेतला आहे. नांदुर्खी येथे विनापरवाना व जास्त गर्दी जमवून लग्न सोहळा साजरा करणाऱ्यांवर शिर्डीचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक गंधाले यांनी महसूलच्या मदतीने कारवाई केली. सध्या लग्नाचे मुहूर्त असल्याने प्रशासनाने गावोगावी टेहळणी वाढवली असल्याचे तहसीलदार कुंदन हिरे यांनी सांगितले.
गेल्या महिन्यात तालुक्यातील चितळीत कोरोनाने उच्छाद मांडला होता. काही सुज्ञ नागरिकांनी तातडीने ही बाब तहसीलदार कुंदन हिरे यांच्या निदर्शनास आणून दिली. रेल्वेस्थानकावर मोठी गर्दी झाली असून चप्पल, मोबाइल, दारूसह अनेक दुकाने सुरू आहेत. नागरिक मास्क न वापरता गर्दी करत आहेत, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे, अशी माहिती देत नागरिकांनी कोरोना वाढला, तर याला जबाबदार कोण, असा सवालही उपस्थित केला. काहीही करून आमचे गाव वाचवा, अशी सादही नागरिकांनी तहसीलदार हिरे यांना घातली. यानंतर तहसीलदार कुंदन हिरे व गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे यांनी तातडीने स्थानिक प्रशासनाला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार चितळीच्या तलाठी व ग्रामसेवकांनी २१ दुकानांवर कारवाई करून १०.३० हजारांचा दंड ठोठावला. राहाता- शिर्डी बाह्यवळण रस्त्याला कोऱ्हाळे, डोऱ्हाळेसह अनेक ठिकाणी सर्व हॉटेल्स व दुकाने सुरू असल्याने प्रशासनाने तीकडे मोर्चा वळवला आहे.
रुग्णसंख्या कमी झाली असली तरी कोरोना पूर्णपणे गेलेला नाही. नियम पाळा; अन्यथा कारवाईला तयार राहा, असा सज्जड इशारा तहसीलदार हिरे यांनी दिला आहे.