दुकाने, हॉटेल्स आतून सुरू, बाहेरून बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:20 IST2021-07-26T04:20:30+5:302021-07-26T04:20:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : दुकाने सुरू ठेवण्याची सकाळी सात ते दुपारी चार ही वेळ असली तरी नगर शहरात ...

दुकाने, हॉटेल्स आतून सुरू, बाहेरून बंद
लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : दुकाने सुरू ठेवण्याची सकाळी सात ते दुपारी चार ही वेळ असली तरी नगर शहरात चारनंतरही अनेक दुकाने उघडीच असतात, चहा, खाद्यापदार्थ्यांचे गाडे, दुकानेही सर्रास सुरू असतात. शनिवारी, रविवारी दुकाने पूर्ण बंद असली तरी अर्धवट शटर ठेवून नगर शहरात अनेक दुकाने सुरूच असल्याचे दिसले. हॉटेल तर बाहेरून बंद आणि आतून सुरूच असल्याचे दिसले.
जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. राज्यात सगळीकडे निर्बंध स्तर-३ चे नियम लावण्यात आले आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यात सकाळी ७ ते दुपारी ४ या काळातच दुकाने सुरू ठेवण्यात आली आहेत. सायंकाळी पाचनंतर पूर्णपणे संचारबंदी लागू आहे. शनिवारी, रविवारी पूर्ण लॉकडाऊन आहे. मात्र नगर शहरात निर्बंध लागू आहेत की नाही, अशीच स्थिती पहायला मिळाली. संचारबंदी तर कुठेच दिसत नाही. दुपारी चारनंतर किराणा दुकाने, दूध विक्री, बेकरी, खाद्य पदार्थ्यांची दुकाने सुरूच असतात. हॉटेलही रात्री उशिरापर्यंत सुरूच असतात. त्यामुळे नियम आहेत की नाही? याचीच शंका येते.
---------------
या दुकानांवर लक्ष कोणाचे?
नगर शहरात दुपारी चारनंतर अनेक दुकाने उघडी असतात. ज्यांच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी दिली आहे, ते पोलीस, महापालिका प्रशासन मात्र नियमांचे पालन होते की नाही, हे देखील पहायला रस्त्यावर उतरताना दिसत नाहीत. महापालिकेचे दक्षता पथक शहरात फिरते मात्र किरकोळ कारवाई करून ते पुढे जाते. त्यामुळे चहाची दुकाने, खाद्य पदार्थ्यांची स्टॉल रात्री उशिरापर्यंत सुरूच असतात.
-------------
कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. नागरिक गर्दी करीत आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी दक्षता पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून महापालिकेला सहकार्य करावे.
-शंकर गोरे, आयुक्त, महानगरपालिका
-------------
शटर बंद...व्यवसाय सुरू
बालिकाश्रम रोड, पाईपलाईन रोड, प्रोफेसर चौक आदी ठिकाणी शटर अर्धवट ठेवून व्यवसाय केला जात आहे. डेअरीची दुकाने तर दुपारी चारनंतर तसेच शनिवारी, रविवारीही शटर बंद ठेवून सुरूच असतात. मध्य नगर भागात, गुलमोहोर रोडवरही रविवारी अशी दुकाने उघडी असल्याचे दिसले.
----------------
कोरोना हवा की जेवण ?
अत्यावश्यक सेवा वगळता इतर आस्थापना नगरमध्ये दुपारी चार वाजता बंद होणे अपेक्षित आहे. मात्र ती रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे चित्र नगर शहरात पहायला मिळत आहे. महामार्गावरील हॉटेल, दुकाने, चहाची दुकाने, टपरी, भाजीविक्री, किराणा दुकानेही सायंकाळनंतर उघडी असतात. खासगी आस्थापनाही शटर उघडे ठेवून काम करीत असल्याचे दिसून आले.
----------
कोरोना काळात मनपाने वसूल केलेला दंड
पहिल्या लाटेनंतर-२,५०,०००
दुसऱ्या लाटेनंतर- ६,६३,७००
--------------------